नवी दिल्ली - आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर धाडी टाकण्यात येत आहे. यामध्ये खळबळजनक माहिती समोर येत आहे. आयकर विभागाने नुकतेच मुंबईच्या दोन रिअल इस्टेट व्यवसायिक कंपन्यांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही कुटुंबीयांवर छापे टाकल्यानंतर त्यांना सुमारे 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली, अशी माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली. आयकर विभागाने 7 ऑक्टोंबरला जवळपास 70 ठिकाणी छापे मारले. यात मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरचा समावेश आहे.
संशयास्पद व्यवहार -
आयकर विभागाला छापेमारीदरम्यान गोळा झालेल्या पुराव्यामुळे अनेक प्रथमदर्शनी बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. तसेच दोन ठिकाणच्या सुमारे 184 कोटी रुपयांच्या बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावे देणारे धक्कादायक कागदपत्रे देखील सापडली असल्याची माहिती सुत्रांमार्फत मिळाली आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्या कोल्हापुरातील बहिण आणि पुण्यातील दोन बहिणींच्या घरी छापे टाकले होते. आयकर विभागाच्या माहितीनुसार, यावेळी 2 कोटी 13 लाखांची बेहिशेबी रोख रक्कम आणि 4 कोटी 32 लाखांचे सोने सापडले होते. यात प्राईमा फेसीई या व्यावसायिक कंपन्यांच्या संकेतस्थळासह व्यवहारांची तपासणी करण्यात आली. मात्र प्रथमदर्शनी हे व्यवहार संशयास्पद असल्याचे दिसून आले.
कुटुंबीयांच्या नावे मालमत्ता -
आयकर विभागाने दावा केला आहे की, व्यवहारांच्या देवाणघेवाणीच्या प्राथमिक विश्लेषणानुसार कंपन्यांमध्ये बेहिशोबी निधी असल्याचे पुढे येत आहे. यामध्ये बोगस शेअर प्रीमियम, संशयास्पद असुरक्षित कर्ज, विशिष्ट सेवांसाठी असमाधानकारक अॅडव्हान्सची प्राप्ती, अस्तित्वात नसलेल्या विवादांमधून एकत्रित लवादाचे व्यवहार इत्यादींचा समावेश आहे. तसेच कुटुंबाच्या सहभागासह संशयास्पद व्यवहार झाल्याचे निरीक्षण केले आहे. संशयास्पद पद्धतीने सादर करण्यात आलेल्या या निधीचा उपयोग विविध मालमत्तांच्या अधिग्रहणासाठी केला गेला आहे. यामध्ये मुंबईतील एका प्रमुख ठिकाणी कार्यालय इमारत, दिल्लीतील समृद्ध परिसरातील फ्लॅट, गोव्यातील रिसॉर्ट, राज्यातील शेतजमीन आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आली असून या सर्व मालमत्तांचे मूल्य सुमारे 170 कोटी रुपये इतके आहे, असे आयकर विभागाने म्हटले आहे.