मुंबई - अभिनेता एजाज खानने टिक टॉकच्या माध्यमातून मुंबई पोलिसांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरत एक व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केला होता. त्यामुळे मुंबईच्या सायबर सेलच्या पोलिसांनी त्याला अटक केली. आज त्याला मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला २० जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
समाज माध्यमांवरील टिकटॉक स्टार फैझल शेख आणि त्याच्या इतर ४ सहकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवून पोस्ट केला होता. यात त्यांनी तबरेझ अन्सारीची हत्या केली पण त्याच्या मुलाने या हत्येचा बदला घेतला तर मुसलमान आतंकवादी आहे, असे म्हणू नका, असे म्हटले होते. त्यानंतर मुंबईच्या एल टी मार्ग पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर एजाजने या मुलांना पाठिंबा देण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट करुन पोलिसांना आव्हान दिले. त्यामुळे पोलिसानी त्याच्या विरोधात कारवाई करत त्याला अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली. यावेळी एजाजची पत्नी तेथे हजर होती. तिने आपला नवरा प्रत्येक भारतीयांसाठी बोलत असून त्याला या प्रकरणात अडकवले जात आहे, असे म्हटले.
यापूर्वीही एजाजला केली आहे अटक
अंमली पदार्थ बाळगल्याचा गुन्ह्यात काही महिन्यांपूर्वी एजाजला नवी मुंबईतील बेलापूर येथून पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर सुटला होता. बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.