मुंबई - राज्यातील शेतकरी विविध शेतमाल उत्पादित करत असतो. मात्र, या शेतमालाचा विपणन करणे आणि निर्यात योग्य बनवणे. या तंत्राचा अभाव शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे निर्यातीचे तंत्र राज्य सरकार शेतकऱ्यांना शिकवणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse ) यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळत नाही. विविध पिकांबाबत शेतकऱ्यांची हमीभावाची मागणी आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी शेतात उत्पादित केलेला माल निर्यात योग्य कसा करता येईल. त्याला चांगले पॅकेजींग करून बाजारात कसा आणता येईल. या विषयी प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी राज्यातील ३५२ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यायला सरकारने सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी आपले उत्पादन निर्यात योग्य करून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये येऊन थेट विक्री करावी, हा यामागील उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
कृषी अधिकाऱ्यांना पुण्यात प्रशिक्षण - भुसे
शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाच्या विपणनाचे प्रशिक्षण देण्यासाठी ३५२ कृषी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या कृषी अधिकाऱ्यांचे सध्या पुण्यात प्रशिक्षण सुरू असून त्यानंतर हे कृषी अधिकारी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना निर्यात योग्य उत्पादन करण्याचे तंत्र अवगत होईल, असा विश्वास कृषी मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे.
जे विकणार तेच पेरणार - भुसे
कोरोना महामारीच्या दरम्यान राज्यातील मोठ्या शहरातील विविध रहिवासी सोसायट्यांमध्ये जाऊन शेतकरी आपली उत्पादने विकत होते. यामध्ये भाजीपाल्यापासून कडधान्यपर्यंतचा समावेश होता. ही यंत्रणा कायमस्वरूपी करता येईल का याबाबत सरकार विचार करीत आहे. तसेच जे विकत घेतले जात आहे, तेच यापुढे पेरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल, असे भुसे यांनी सांगितले.
या उत्पादनांची होते निर्यात
राज्यातील कृषी उत्पन्न मालाच्या निर्यातीसाठी केंद्र आणि राज्याचे धोरण लागू आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विपणन महामंडळातर्फे महाराष्ट्रातील ताजी फळे, फुले, भाज्या यांची निर्यात केली जाते. त्याशिवाय आंबा, द्राक्षे ,आमरस, काजू, संत्रा, मका, तांदूळ यांच्यासह अन्य उत्पादने निर्यात होतात. कृषी विपणन महामंडळाने राज्यातील ४४ निर्यात केंद्राद्वारे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या महामंडळामार्फत शेतकरी, शेतकऱ्यांचे समूह आणि सहकारी संस्थांना निर्यातीसाठी मदत केली जाते.
राज्यातील फळांच्या निर्यातीची स्थिती
आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यातून २०१९-२० मध्ये ३०७ कोटी रुपयांच्या आंब्याची निर्यात करण्यात आली. तर २०१८-१९ मध्ये ३१४ कोटी आणि २०१७-१८ मध्ये ३०९ कोटी रुपयांच्या आंब्यांची निर्यात झाली होती. २०१८-१९ मध्ये १ हजार ३७१ कोटी रुपयांच्या द्राक्षांची निर्यात झाली होती.
हे ह वाचा - Omicron : परदेशातून मुंबईत आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांची संख्या 23 वर