मुंबई - शेतकऱ्यांना दरवर्षी खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करणारी प्रधानमंत्री पीएम किसान योजना सक्षमपणे राबवण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत वाढलेले आठ लाख लाभार्थी अपात्र असतील तर, चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.
कृषीमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री पीएम किसान योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी मी सर्वंकष अशी बैठक घेतली आहे. योग्य लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मी जातीने लक्ष घालून सक्तीने सूचना दिल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत अचानक आठ लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. याबाबत तक्रारी असतील आणि काही अपात्र सदस्यांना लाभ दिले असतील तर, अशा प्रकरणांची सखोल चौकशी केली जाईल. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, वसुलीची देखील कारवाई केली जाईल, असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी वेळ घेऊन केंद्राकडे राज्याचे शिष्टमंडळ नेण्यात येईल. कांदा प्रश्नी निश्चितपणे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.