मुंबई - म्हाडाच्या नावाने होणारी नवी फसवणूक समोर आली आहे. कांदिवली महावीरनगर ट्रान्झिट कॅम्पच्या पुनर्विकासातील घरांची 15 लाखांत दलालांकडून विक्री होत आहे. मागील कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून म्हाडाला मात्र याचा पत्ता नव्हता. याविषयीच्या तक्रारी आल्यानंतर म्हाडाला जाग आली आहे.
अतिधोकादायक आणि कोसळलेल्या उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवण्यात येते. यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी दुरुस्ती मंडळाने मोठ्या प्रमाणावर ट्रान्झिट कॅम्प उभारले आहेत. यातील अनेक ट्रान्झिट कॅम्पची दुरावस्था झाली आहे. हे कॅम्प जुने झाले आहेत. अशा कॅम्पमध्ये हजारो रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. तेव्हा या ट्रान्झिट कॅम्पचा पुनर्विकास करण्याचा निर्णय दुरुस्ती मंडळाने घेतला आहे. त्यानुसार काही ट्रान्झिट कॅम्पच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. या पुनर्विकासातील घरे संक्रमण शिबीर म्हणून वापरली जाणार आहेत.
हेही वाचा-ए आर रहमानच्या आईचे निधन, संगीतकार घडवण्यात होता मोलाचा वाटा
याच पुनर्विकासातील घरांची दलाली
ट्रान्झिट कॅम्पच्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कांदिवली महावीर नगर ट्रान्झिट कॅम्पचा पुनर्विकास करण्यात येत आहे. यातील काही इमारतीची कामे सुरू आहेत. तर काही इमारती पूर्ण झाल्या आहेत. याच इमारतीतील घरे मिळवून देण्याच्या नावाखाली दलाल सर्वसामान्यांना जाळ्यात ओढत आहेत. ही घरे 15 लाखांत देण्याचे आमिष दाखवत नागरिकांकडून पैसे लाटले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुळात म्हाडाच्या कोणत्याही घराची विक्री ही लॉटरीशिवाय होत नाही. अशावेळी खोटी कागदपत्रे तयार करत दलाल नागरिकांची फसवणूक करत आहेत.
हेही वाचा-भाजप नेत्यांविरुद्ध बोलल्यास त्यांच्यामागे ईडी-सीबीआय लावली जाते - गृहमंत्री
दोन तक्रारी दाखल-
घरे बेकायदेशीररित्या केव्हापासून विकली जात आहेत, किती नागरिकांची फसवणूक झाली आहे असे अनेक प्रश्न आहेत. पण त्याचवेळी म्हाडा न दुरुस्ती मंडळ याबाबत अनभिज्ञ कसे हाही प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. म्हाडाच्या दक्षता विभागाकडे याबाबतच्या दोन तक्रारी आल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. या प्रकरणाची माहिती घेतली असता दलालांनी आणखी 20 जणांना फसवले असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले आहे.
भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन-
दक्षता विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर दुरुस्ती मंडळाला खडबडून जाग आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दुरुस्ती मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तर या प्रकरणाची चौकशी ही होणार असल्याची माहिती घोसाळकर यांनी दिली आहे. म्हाडाने बेकायदा घरांच्या विक्रीची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाची कोणतीही घरे ही लॉटरीशिवाय विकली जात नाहीत. तेव्हा अशा कोणत्याही भूलथापांना व दलालांच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन घोसाळकर यांनी केले आहे.