मुंबई - अनुदानाच्या मागणीसाठी मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या आकाशवाणी आमदार निवासाच्या चौध्या मजल्याबर जाऊन चक्क शोले स्टाईल आंदोलन करणार्या शिक्षकाला आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लेखी आश्वासन दिले. त्यामुळे या शिक्षकाने हे आंदोलन मागे घेतले. गजानन खैरे असे या शिक्षकाचे नाव आहे. तो जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. अनुदानाचा प्रश्न सरकारकडून सोडवला जात नाही, या मागणीसाठी त्यांनी हे आकाशवाणीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले.
या आंदोलनाची महाविकास आघाडी सरकारकडून तातडीने दखल घेत यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे तातडीने दाखल झाले. त्याचसोबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हेही येऊन या शिक्षकाला खाली येण्याची विनंती केली. तुमचा प्रश्न आम्ही तातडीने सोडवू, मात्र तुम्ही खाली या असे वेळोवेळी आवाहन विधानसभा अध्यक्षांनी केले. परंतु, सुरुवातीला या शिक्षकाने कोणाचेही ऐकले नाही. यामुळे शेवटी या शिक्षकाला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सहीने अनुदानाचा प्रश्न सोडवला जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यासोबतच अनुदानाच्या प्रश्नाचा विषय लवकरच सरकारकडून सोडवला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यावेळी या शिक्षकाने आपले आंदोलन मागे घेतले.
आकाशवाणी आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावर चढून केलेल्या खैरे या शिक्षकाच्या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणा चांगलीच कामाला लागली होती. तर या परिसरात बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षक शोले स्टाईल आंदोलन करत असल्याचे मेसेज गेल्याने काही क्षणातच अग्निशमन यंत्रणा आणि इतर यंत्रणेचे अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित झाले होते. शिक्षकाला आवाज जावा म्हणून त्यासाठी तातडीने स्पीकर लावून त्याच्याशी संवाद साधला जात होता. परंतु, त्यांनी सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना प्रतिसाद दिला नाही. त्यासोबतच शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आणि शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे हेही त्या शिक्षकाला वेळोवेळी विनवणी करत होते, परंतु त्याने कोणाचे ऐकले नाही. यामुळे शेवटी त्याला लेखी आश्वासन देण्यात आले.
सरकारकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर गजानन खैरे या शिक्षकाला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले व त्याला मरीन लाईन पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. शिक्षकाच्या आंदोलनानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अनुदानाचा प्रश्न गंभीर आहे. तो सोडवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठीच लवकर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. यासाठी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. मला शिक्षकाच्या या आंदोलनाची माहिती मिळताच मी तातडीने इकडे पोहोचलो. सुरुवातीला त्याला विनंती केली, परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे आम्ही सरकारकडून लेखी आश्वासन देण्याचा निर्णय घेतला आणि तातडीने त्याला हे लेखी आश्वासन दिले. त्यासोबतच अनुदानाच्या प्रश्नासंदर्भात लवकरच बैठक लावून यासाठीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मी त्याला दिली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.