मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरु आहे. लसीकरण केल्यानंतर कोरोनाचा प्रसार होणार नाही असा समज आहे. मात्र लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या एकूण २३ हजार २३९ मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या ९ हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
२३ हजार २३९ नागरिकांना कोरोना -
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. या मोहिमेनंतर नागरिकांना पुन्हा कोरोना होतो का यावर पालिकेने एक सर्व्हेक्षण केले आहे. मुंबईमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २५.३९ लाख इतकी होत असतानाचे हे सर्वेक्षण आहे. या सर्वेक्षणानुसार मुंबईत २३ हजार २३९ नागरिकांना कोरोनाची लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन्ही डोस घेऊनही ९ हजार १ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिला डोस घेऊन कोरोना झालेल्यांची संख्या १४ हजार २३९ आहे. लस घेऊनही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण हे ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये सर्वाधिक आहे.
०.३५ टक्के नागरिकांना कोरोनाची पुन्हा लागण -
मुंबईत झालेल्या एकूण लसीकरणापैकी ०.३५ टक्के नागरिकांना कोरोनाची पुन्हा लागण झाली आहे. दोन्ही डोस घेतलेल्या १ लाख नागरिकांपैकी ३५० लोकांना पुन्हा कोरोनाची लागण होत आहे. लसीकरण होऊनही कोरोना होण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. पण याचे प्रमाण खूप कमी आहे, असेही मुंबई पालिकेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईकरांनी लसीबाबत भीती बाळगू नये. अहवाल तयार करते वेळी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २५.३९ लाख होती. यापैकी ९००१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी पाहिल्यास लसीकरणानंतर कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण नगण्य आहे. मात्र ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
१ कोटी ५ लाख ९६ हजार ४१३ लसींचे डोस -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत ७ लाख ३६ हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ७ लाख १३ हजार नागरिकांनी कोरोनावर मात करून ते बरे झाले आहेत. तर १६ हजार ३७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत १६ जानेवारीपासून आतापर्यंत १ कोटी ५ लाख ९६ हजार ४१३ लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यामधील ७४ लाख ६४ हजार १३९ लाभार्थ्यांना पहिला तर ३१ लाख ३२ हजार २७४ लाभार्थ्यांना लसींचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
'कोरोना नियमांचे पालन करा'
लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी कोरोना होणार नाही असा समज कोणीही करू नये. कोरोनाला हरवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, तोंडावर मास्क लावणे आणि गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. लसीचे दोन्ही डोस घेतले असलेल्या लाभार्थ्यांना कोरोनाची लागण झाली तरी त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्याची गरज पडत नाही, त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकांनी यांनी केले आहे.
लसीकरणानंतर कोरोना, वयोगट -
१८ ते ४४ वयोगटात
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण- ४४२०
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- १८३५
४५ ते ५९ वयोगट
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण- ४८१५
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- २६८७
६० वर्षांवरील नागरिक
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण - ५००४
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण - ४४८९
हेही वाचा - दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबईची जीवनवाहिनी; लोकलसह महत्वाच्या ठिकाणांची केली रेकी