मुंबई - माजी मंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्षाने संजय राठोड यांचा राजीनाम्याची मागणी केली. राजीनामा घेतला नाही तर, अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपने दिला होता. मात्र संजय राठोड यांचा राजीनामा झाल्यानंतर आता भाजपकडून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड यांचा राजीनामा सरकार घेत असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.
त्यामुळे लवकरात लवकर धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नैतिकता दाखवत धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा द्यायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या बहिणीने बलात्काराचे आरोप केले होते. त्यासंबंधीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र कौटुंबिक कारणामुळे तो गुन्हा नंतर मागे घेण्यात आला. मात्र आता भाजपकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यामुळे संजय राठोडनंतर आता धनंजय मुंडे यांच्यामागे विरोधक लागणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाले आहे.
काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण -
काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली आहे. भाजपकडून आतातायीपणा सुरू झाला आहे. भाजप केवळ राजकारण करते आणि त्यांना फक्त राजीनामे हवे आहेत. असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. दादरा- नगर हवेलीचे खासदार यांनी मुंबईत आत्महत्या केली मात्र भाजप त्यावर एक शब्दही काढत नाही, असा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे