मुंबई - शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत थेट गुवाहाटी गाठली. 40 आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. या 40 आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेच्या ठाणे, मराठवाडा अशा बालेकिल्ल्यांना खिंडार पडले. यातीलच एक महत्त्वाचा विभाग म्हणजे ( Shivsena Konkan ) कोकण. कोकण आणि शिवसेना हे एक घट्ट नात असल्याचे आपण मागची अनेक वर्षे पाहत आलो आहे. मात्र, याच कोकणात बंडखोरी झाली. ते बंडखोर आता कॅबिनेट मंत्री झालेत. त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा पक्ष उभा करणे हे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे काय आहे नेमका शिवसेनेचा प्लॅन बी? यावर ईटीवी भारतचा विशेष रिपोर्ट.
कोकणी माणूस आणि शिवसेना इतिहास : मुंबईत तुम्हाला कोकणी लोक मोठ्या प्रमाणात दिसतील. त्याला कारण म्हणजे मुंबईतील पूर्वीचा गिरणी उद्योग. या गिरण्यांमध्ये काम करणारे कामगार मोठ्या प्रमाणात कोकणातील होते. जेव्हा या गिरण्या बंद पडत होत्या त्यावेळी या कामगारांच्या मागे शिवसेना भक्कमपणे उभी होती. तेव्हापासून आजपर्यंत अगदी कोकणात असो अथवा मुंबईत कोकणी माणूस हा भावनिकतेने शिवसेनेच्या मागे नेहमीच ठाम उभा राहिलेला दिसतो. त्यामुळेच कोकणात शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतात.
कोकणात सर्वाधिक शिवसेना : आपण फक्त या चार जिल्ह्यांचा विचार केला तरी, या चार जिल्ह्यांमध्ये एकूण 21 विधानसभा मतदारसंघ येतात. 2019 ची आकडेवारी पाहता या भागात शिवसेनेचेच सर्वात जास्त आमदार निवडून आल्याचे निदर्शनास येते. पक्षवाईच आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक म्हणजेच 10 आमदार हे शिवसेनेचे, 3 आमदार राष्ट्रवादीचे, 2 आमदार शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी 2, भाजप 2 आणि काँग्रेस अशी ही आकडेवारी दिसते. यात महाड, अलिबाग, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, कर्जत, पालघर, सावंतवाडी या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चांगल्या मताधिक्याने निवडून आले.
शिवसेनेचं दुर्दैव : शिवसेनेचा प्राण हा मुंबई आणि कोकणात बसतो असे म्हटल्यास काही वावगे वाटू नये. कारण, शिवसेनेचे सर्वाधिक आमदार हे याच भागातून निवडून येतात. याच आमदारांच्या जोरावर शिवसेना 2014 साली भाजपसोबत सत्तेत आली. त्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. यावेळी तर थेट मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळालं होतं. पण शिवसेनेचे दुर्दैव म्हणजे पक्षविरोधी बंड देखील याच भागातून झालं. मग ते 2005 नारायण राणेंचं बंड असो अथवा आता 2022 एकनाथ शिंदे यांचे या दोन्ही बंडांमुळे शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाला घाम फुटला एवढ मात्र नक्की.
7 गेले 3 शिल्लक : कोकणातून शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतात. मात्र, या दहा आमदारांमधून 7 आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सामील झाले. तर, फक्त तीनच आमदार या विभागात शिवसेनेकडे उरतात. यात शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांमध्ये दीपक केसरकर, रत्नागिरी विधानसभा उदय सामंत, महाडच्या आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, दापोली मतदारसंघ योगेश कदम, कर्जत महेंद्र थोरवे, पालघर श्रीनिवास वनगा अशी ही 7 बंडखोर आमदारांची नाव. तर, शिवसेनेकडे उरलेल्या तीन आमदारांमध्ये कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, गुहागर विधानसभा भास्कर जाधव, राजापूरचे आमदार राजन साळवी हे तीनच आमदार सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंसोबत आहेत.
तिघेजण टक्कर देणारे आमदार शिवसेनेचा प्लॅन B? : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून एवढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने आता या सात जणांना टक्कर देण्याची जबाबदारी या तीन आमदारांवर आलेली आहे. या तीन आमदारांचा इतिहास पाहिल्यास आपल्या लक्षात येईल हे तीनही आमदार काही कच्चा गुरुचे केले नाहीत. मध्यंतरीच्या काळात 'राणे म्हणजेच कोकण' असं म्हटले जायचे. जेव्हा राणेंनी शिवसेना सोडली त्यावेळी 'कोकणातून शिवसेना संपली' असे म्हटले जाऊ लागले. पण, त्याचवेळी राणेंना टक्कर देणारा एक पट्ट्या उभा राहिला तो म्हणजे आमदार वैभव नाईक. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनी खुद्द नारायण राणे यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता. इकडे राणे विरुद्ध नाईक संघर्ष सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश करत राणे कुटुंबाविरोधात दंड थोपटले. आता हेच केसरकर बंडखोर गटात सामील झाल्याने वैभव नाईक यांना राणे आणि केसरकर या दोघांविरुद्ध लढावे लागणार आहे.
आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी (रत्नागिरी) : रत्नागिरी जिल्हा बाबत बोलायचं झाल्यास या जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. गुहागर, चिपळूण, दापोली, राजापूर, रत्नागिरी असे हे पाच मतदारसंघ. या पाच मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे चार आमदार आहेत यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे उदय सावंत, दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम, राजापूर मतदारसंघाचे राजन साळवी आणि गुहागर मतदार संघाचे भास्कर जाधव यांचा समावेश होतो. यात आता उदय सामंत शिंदे आणि योगेश कदम बंडखोर गटात सामील झाल्याने रत्नागिरीत शिवसेनेचे राजन साळवी आणि भास्कर जाधव हे दोघेच उरतात. या दोघांमध्ये भास्कर जाधव हे शिवसेनेचे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात. विधानसभेचे तालिका अध्यक्ष असताना भास्कर जाधव यांनीच भाजपाच्या तब्बल 12 आमदारांचे निलंबन केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तर, राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय व निष्ठावंत मानले जातात. विधान अध्यक्षांच्या निवडणुकीवेळी राहुल नार्वेकर यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा एकदा बळकटी देण्याची जबाबदारी या दोन आमदारांवर असल्याचं बोललं जाते.
'मुंबईत कोकणाचा आत्मा वसतो' : ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक रवींद्र आंबेकर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, कोकणातला हा शिवसेनेचा संघर्ष आता काही नवा नाही. याआधी सुद्धा शिवसेनेला कोकणातून वारंवार झटके बसलेले आहेत. नारायण राणे जेव्हा बाहेर पडले त्या काळात हा संघर्ष मोठ्या प्रमाणात जाणवला. त्यानंतर देखील छोट्या-मोठ्या घटना होतच राहिल्या. रायगडमध्ये पाहिलं तर तिथले राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी शिवसेनेला रोखून धरलं होतं. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी होती. सोबतच आपण पाहिलं तर मुंबईला बघून कोकण होऊ शकत नाही कारण मुंबईत कोकणाचा आत्मा वसतो. अगदी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये बघितले तरी यात निवडून येणाऱ्या नगरसेवकांमध्ये कोकणातील संख्या अधिक असते. जवळपास अंदाजे 60% नगरसेवक हे कोकणातील आहेत. मुंबईला वगळून कोकणाची स्ट्रॅटेजी ठरवता येणार नाही. त्यामुळे कोकणाची रणनीती असताना मुंबई डोळ्यासमोर ठेवूनच पुढची रणनीती आखली पाहिजे, अशी प्रतिक्रिया रवींद्र आंबेकर यांनी दिली.
'कोकणी माणूस शिवसेनेपासून दूर जाणार नाही' : कोकण हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. कारण, मुंबईत कोकणी माणूस सर्वाधिक आहे. अगदी छोट्या छोट्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील कोकणात तिथे देखील शिवसेनेचे वर्चस्व आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेनेच्या ज्या काही संघटना आहेत. अंतर्गत संघटना असतील त्यामध्ये कोकणातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वाधिक आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोकणातील चाकरमानी आणि कोकणातील कार्यकर्ते हे आज देखील शिवसेने सोबत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत आहेत. एक गोष्ट आपण अधोरेखित केली पाहिजे ती म्हणजे आज शिवसेनेत जेवढे आउटगोइंग झालं त्याच्यापेक्षा इनकमिंग वाढला आहे. कोकणी माणूस शिवसेनेपासून दूर जाणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार मनीषा कायंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा - Arvind Sawant : सुशील मोदींच्या वक्तव्यानंतर अरविंद सावंतांचा भाजपावर निशाणा, म्हणाले...