मुंबई - मीरा-भाईंदर शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीरा-भाईंदरमधील स्केटींग रिंग लोकार्पण, चिमाजी आप्पा यांच्या पुतळ्याचे अनावरण, महाराणा प्रताप पुतळ्याच अनावरण, नवीन नाट्यगृहाचे लोकार्पण तसेच नवीन रुग्णालय इमारतीच भूमिपूजन आणि महानगरपालिकेचे नवीन प्रशासकीय भवनाच भूमिपूजन, असे शहरातील महत्त्वाच्या विकास कामाच भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरहजेर राहिले. दरम्यान, शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. तसेच मनपा प्रशासमार्फत महापौर, सभापती वगळता भाजपच्या ५० हुन अधिक नगरसेवकांना प्रवेश नाकारला. वादाला यामुळे तोंड फुटले. माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आक्रमक पवित्रा घेत, कार्यक्रम स्थळाबाहेर ठिय्या मांडला. रुग्णालय आणि नवीन पालिकेच्या प्रशासकीय भवनाच्या जागेवर आक्षेप नोंदवल्याने वाद अधिक चिघळला. भाजप नगरसेवकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. तणावाचे वातावरण यामुळे निर्माण झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांची समजूत काढली.
सरनाईकांचा हस्तक्षेप रोखणार - प्रताप सरनाईक यांचा मीरा भाईंदर मनपा प्रशासनात हस्तक्षेप वाढला आहे. भाजप नगरसेवकांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा घाटाटोप करत असतात. ११ ऑक्टोबरच्या कार्यक्रमात देखील आमदार सरनाईक यांच्या सांगण्यावरून प्रशासनाने भाजप नगरसेवकांना दूर ठेवले. आमदार सरनाईक गेली दोन टर्म ओवळा - माजीवाड़ा मतदार संघातून विधानसभेत जात आहेत. मात्र, स्वतःच्या निधीतून शौचालय दुरुस्ती व्यतिरिक्त सांगण्यासारखे असे एकही मोठे काम केले नाही. नगरसेवकांच्या कामांमध्ये स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. भाजप सोबत असलेल्या युतीमुळे गप्प राहावे लागते. त्यामुळे सरनाईक यांचा हस्तक्षेप वाढला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून योग्य वेळी निर्णय घेऊ, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिल्याचे भाजपच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे.
सरनाईकांच्या मतदारसंघात मेहतांकडून तयारी सुरू - ओवळा माजिवडा मतदारसंघ मिश्र वस्तीचा म्हणून ओळखला जातो. एकीकडे झोपडपट्टीचा भाग येतो. घोडबंदरची उच्चभ्रू वस्तीही दुसरीकडे याच मतदारसंघात येते. सरनाईक यांची स्वतःची एक बांधणी आहे. २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या संजय पांडे यांनी चुरशीची लढत दिली होती. २०१९ मध्ये शिवसेनेची भाजपबरोबर युती झाल्याने इच्छुकांनी मनावर दगड ठेवला होता. यंदा शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी हा मतदार संघ भाजपला सोडण्याबाबत सरनाईकांवर दबाव टाकल्याची चर्चा रंगली होती. सरनाईक यांनी हे वृत्त फेटाळून लावले. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिंदे गट आणि भाजपमधील वादानंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता ओवळा - माजीवाड़ा मतदार संघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तशी तयारी देखील सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
प्रशासनाविरोधात आंदोलन - मीरा भाईंदर येथील कार्यक्रम मनपा प्रशासनाचा होता. गर्दी खूप झाली होती. प्रशासनाने माजी आमदार नरेंद्र मेहता आणि सभापती वगळता इतरांना बसायला जागा नाही, असा निरोप पोलिसांमार्फत पाठवला. प्रशासनाने यावेळी भूखंडाबाबत मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली. त्यामुळे माजी आमदार मेहता यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाविरोधात ठिय्या मांडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मेहता यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतले, असे माजी सभापती संजय थेराडे यांनी सांगितले.