मुंबई - मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिया द क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची धाड पडल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आतापर्यंत अकरा जणांना अटक झाली आहे. आर्यन खानला न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. आता एकीकडे एनसीबीची कारवाई सुरू असताना दुसरीकडे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी एन्ट्री मारली आहे.
हेही वाचा - Cruise Drug Case : एनसीबी कारवाईपूर्वीचे क्रुझ ड्रग्स पार्टीचे व्हायरल व्हिडिओ
डीजी शिपिंग आणि एमबीपीटीशी बोलणार मुंबई पोलीस
शनिवारी कॉर्डिया द क्रूझवर झालेल्या पार्टीवर एनसीबीची छापा पडल्यानंतर या पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी दिसून आली. याशिवाय अनेकजण मास्क न घालता नृत्य करत असल्याचे दिसून आले. सध्या राज्यात कोव्हिड-19मुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. कलम 188चे उल्लंघन झाले आहे का, याचाही तपास मुंबई पोलिसांकडून करण्यात येणार आहे. याशिवाय क्रूझवर पार्टीसाठी मुंबई पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. मुंबई पोलिसांना परवानगीसाठी कोणतेही लेखी पत्र किंवा क्रूझवरील पार्टीबद्दल मुंबई पोलिसांना कोणतीही सूचना दिलेली नव्हती. क्रूझवर कोणती परवानगी देण्यात आली, याबद्दल मुंबई पोलीस डीजी शिपिंग आणि एमबीपीटीशी बोलणार आहेत.
मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार का?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी कॉर्डियावर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या पार्टीसाठी यलो गेट पोलीस ठाण्याची परवानगी घेणे गरजेचे होते. कारण जिथे पार्टी सुरू होती, तो परिसर यलो गेट पोलीस ठाण्याचा कार्यक्षेत्रात येते. मात्र, कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही किंवा कोणतीही सूचना दिल्या नाही. यामुळे आता मुंबई पोलिसांच्या पोर्ट झोन पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. ज्याप्रमाणे पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्यावरून कोविड नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे मुंबई पोलीस गुन्हा दाखल करण्याचा तयारी आहेत.
हेही वाचा - ड्रग्स पार्टी प्रकरण : शाहरुख खानच्या मुलाने घरचे जेवण नाकारले!
क्रूझची एनसीबीकडून सखोल चौकशी
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या या क्रूझवर हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. त्यानंतर, रविवारी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना काल किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.