मुंबई - गुजराती मतदाराला आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने जोर लावला आहे. मुंबई मा जलेबी ने फाफडा उद्धव ठाकरे आपडा या मेळाव्यानंतर आता रासगरबाच्या माध्यमातून सेना गुजराती मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या रविवारी 7 फेब्रुवारीला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी 21 गुजराती उद्योगपती शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गुजराती उद्योगपतींच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेला आर्थिक बळ मिळणार आहे. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला हा धक्काच आहे. पहिल्या मेळाव्यात सेनेला मिळालेल्या यशानंतर सेना पुन्हा एकदा मेळावा घेत भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत आहे.
भाजपाची व्होटबँक शिवसेना करणार का हॅक?
शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी गुजराती बांधवांसाठी हा कार्यक्रम येत्या ७ फेब्रवारी रोजी मालाडमध्ये आयोजित केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीला आता एक वर्षाचा अवधी उरला असल्याने शिवसेनेने भाजपाची व्होटबँक असलेल्या गुजरातीबहूल विभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले आहे.
सलग दुसरा मेळावा
मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. शिवसेनेने या आधी 10 जानेवारी रोजी गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित केला होता. अंधेरी-ओशिवरा येथील गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये हा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात 100 गुजराती व्यापारी उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना असल्यामुळे या कार्यक्रमात कोरोना नियमांचे पालन करण्यात येणार आहे. तसेच प्रथम येणाऱ्या शंभर लोकांनाच सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शिवसैनिकही उपस्थित राहणार असल्याचे शाह यांनी सांगितले.