मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आज ( सोमवारी ) त्यांना सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी पाठवण्यात आले आहेच. यावेळी संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) यांच्या वतीने अॅडव्होकेट अशोक मुंदरगी यांनी युक्तिवाद केला आहे. ईडीच्या वतीने अॅडव्होकेट हितेन वेणेगावकर यांनी युक्तीवाद केला आहे. संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्याचे प्रमुख आरोपी आहेत, असा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आरोप ईडीच्या वकिलांनी कोर्टात केला. याच मुद्द्यावर राऊतांना 8 दिवसांची ईडी कोठडी द्यावी, अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली. आज झालेल्या युक्तिवाद दरम्यान दोन्हीही पक्षकारांच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तीवादातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे...
- संजय राऊत यांचे अॅडव्होकेट अशोक मुंदरगी युक्तिवाद
- पहिला मुद्दा - संजय राऊतांवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून ही राजकीय सूडापोटी केलेली ही कारवाई आहे.
- दुसरा मुद्दा - तपास यंत्रणा असलेली ईडी ही राजकीय दबावाखाली काम करत आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ही कारवाई केली जात आहे.
- तिसरा मुद्दा - प्रविण राऊत हे व्यापारी आहेत. संजय राऊत हे स्वत: प्रतिष्ठित व्यक्ती असून त्यांच्या स्वत:च्या काही कंपन्या आहेत. त्यातून त्यांना अधिकृतरित्या पैसे मिळतात. त्यामुळे अशा परिस्थितीत संजय राऊतांना ईडी कोठडी देण्यात येऊ नये आणि दिलीच तर आठ दिवसांची न देता कमी दिवसांची द्यावी. दरम्यान सकाळी 7 वाजताच्या सुमारास ईडीचे 8 ते 10 अधिकाऱ्यांचे पथक राऊतांच्या घरात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी करण्यात आली. अखेर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संजय राऊतांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर तेथेदेखील त्यांची सुमारे 8 तास ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली आणि अखेर त्यांना ईडीने अटक केली. आज सकाळी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात घेऊन जाण्यात आले व त्यानंतर कोर्टात हजर केले असता त्यांना 4 ऑगस्टपर्यंतची ईडी कोठडी सुनावण्यात आली.
कोर्टात नेमकं काय घडलं ? : राऊत तपासात सहकार्य करीत नाहीत. तीन वेळा समन्स दिले पण ते उपस्थित राहिले नाही. प्रवीण राऊत हे नावालाच असून संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्याचे प्रमुख आहेत, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला. प्रकल्पाच्या 112 कोटीपैकी 50 कोटी प्रवीण राऊत याना मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख रुपये राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्याच पैशातून राऊत यांनी दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथे जमीन खरेदी केली, असा युक्तिवाद करत ईडीच्या वकिलांनी राऊतांची 8 दिवस कोठडीची मागणी केली. तर दुसरीकडे संजय राऊत तपासात सहकार्य करत आहेत. त्यांना जर कोठडी द्यायची असेल तर कमीत कमी कोठडी द्यावी, अशी विनंती राऊतांचे वकील अशोक मुंदरगी यांनी केली. रोख रकमेचा व्यवहार हा जुना आहे मग आत्ता तो काय काढला जात आहे, असा सवाल करत राजकीय द्वेषापोटी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली जात आहे, असा थेट आरोप संजय राऊतांच्या वकिलांनी केला. दरम्यान संजय राऊत याना हृदय विकाराचा त्रास असल्याने कोर्टाने त्यांना घरचे जेवण आणि औषधाची परवानगी दिली आहे. तसेच सकाळी 8.30 ते 9.30 दरम्यान संजय राऊत वकिलांशी सल्लासमलत करु शकतात आणि 10. 30 नंतर त्यांची चौकशी करणार नाही अशी हमी ईडीने कोर्टाला दिली.
हेही वाचा - Sanjay Raut to ED Custody : संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी; वाचा, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद