मुंबई- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष तसेच विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील ( Narendra Dabholkar Murder Case ) मास्टरमाईंड वीरेंद्रसिंह तावडेचा हेतू हिंदूविरोधी आणि सनातन संस्थेच्या श्रद्धा आणि रूढींना विरोध करणाऱ्या लोकांना संपवण्याचा होता, असे केंद्रीय अन्वेषण विभागाने आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. तावडेच्या जामीन अर्जावर ( Virendra Singh Tawade Bail Application ) मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) आज हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले ( CBI Filed Affidavit In Dabholkar Murder Case ) आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी
विरेंद्र सिंह तावडेला जामीन देण्यास विरोध करण्यासाठी सीबीआयने प्रतिज्ञापत्रात हे दावे केले आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार वैचारिक मतभेदांमुळे 2013 मध्ये दाभोलकरांना जीवे मारण्यासाठी शार्प शूटर्सची नियुक्ती केली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार तावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सनातन संस्थेने शिकवलेल्या क्षात्रधर्म साधनेच्या शिकवणीचे पालन केले, जे कथित दुष्ट, हिंदूविरोधी, धर्मद्रोही आणि दुर्जन यांच्या विरोधात होते.
मॉर्निंग वॉकला जातांना झाली होती दाभोलकरांची हत्या
अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी जाताना दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सीबीआयचे म्हणणे आहे की, या प्रकरणातील आरोपींचा अन्य गुन्ह्यात ज्यात डाव्या विचासरणीचे नेते गोविंद पानसरे, एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत सहभाग आहे.
आहेत विविध आरोप
सीबीआयने घटनेच्या तीन वर्षांनंतर 10 जून 2016 रोजी तावडेला अटक केली आणि त्याला युएपीए कायद्यांतर्गत खून, कट रचणे आणि दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांसाठी त्याच्यासह इतर तिघांवर आरोप ठेवले. पाचवा आरोपी अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. गेल्या वर्षी विशेष पुणे न्यायालयाने आरोपींवर आरोप निश्चित केले होते.
तावडेचा जामीन अर्ज
तावडे याने त्याच्या जामीन अर्जात दावा केला आहे की, विशेष पुणे न्यायालयाने 15 सप्टेंबर 2020 रोजी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्याचा आदेश चुकीच्या पद्धतीने मंजूर केला होता. तावडेला जामीन देण्यास विरोध करताना सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, 2002 पासून त्यांचे अनेक विचारवंता बरोबर वैर आहे. जेव्हा त्यांनी सनातन संस्थेचा पूर्णवेळ भक्त होण्यासाठी ईएनटी सर्जन म्हणून आपली वैद्यकीय प्रॅक्टिस सोडली. सीबीआयने कागदोपत्री पुराव्याचा हवाला दिला आहे की, 2007 मध्ये डॉ. दुर्गेश सामंत, स्पेशालिस्ट अॅलोपॅथिक डॉक्टर (MD) आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी तावडे यांना केवळ दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली होती. त्यांच्या निधनानंतर चार दिवसांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.