मुंबई - समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे ( Sameer Wankhede Father Dnyandev Wankhede ) यांनी मुंबई उच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर मानहानीची याचिका (Defamation petition on Nawab Malik ) दाखल केली आहे. या याचिकेवर नवाब मलिक यांनी काल गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) 95 पानाचं प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. ( Nawab Malik Submitted Affidavit ) त्यात त्यांनी समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर अनेक आरोप केले.
प्रतिज्ञापत्र सादर -
समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांविरोधात कोणतेही विधान करणार नसल्याची हमी उच्च न्यायालयात देऊनही नवाब मलिक वानखेडे यांच्या कुटुंबीयांविरोधात विधाने करतच असल्याचा दावा केला. त्यामुळे मलिक यांनी न्यायालयाचा अवमान केला असल्याचे नमूद करत ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर उत्तर देताना मलिक यांनी ९५ पानांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाची दिशाभूल करून आणि अनुकूल आदेश मिळवून आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यासाठी आणि विशेषत: वानखेडे यांनी केलेल्या बेकायदेशीर गोष्टी उघड करण्यापासून मला रोखण्याच्या हेतूने खटला दाखल केला असल्याचे मलिक यांनी उत्तरात म्हटले आहे. वानखेडे पिता-पुत्रांनी केलेल्या बेकायदेशीर गोष्टी दडपण्यासाठी चुकीच्या हेतूने हा खटला दाखल करण्यात आला आहे. जे मलिक यांनी मिळवलेल्या आणि सादर केलेल्या पुराव्यांवरून समोर आले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध नको -
मलिक यांनी सोशल मिडियावर केलेली विधाने वानखेडे कुटुंबाची बदनामी करणारी किंवा अपमानास्पद नव्हती. ते केवळ वानखेडे यांच्या बेकायदेशीर वर्तनाशी संबंधित होते. ते पाहता आपले भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणतेही निर्बंध लादता येऊ शकत नाहीत, असे मलिक यांनी पुढे स्पष्ट केले. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून जावयाला अटक करण्यात आल्यानंतर सूड म्हणून आपण ही विधाने केली असल्याचा आरोप मलिक यांच्यावर झाला. जावयाला अटक होण्याच्या आधीपासूनच आपण एनसीबीच्या तपास करण्याच्या मनमानी पद्धतीविरोधात बोलत असल्याचे मलिक यांनी आरोपाला उत्तर देताना स्पष्ट केले.
बेकायदेशीर सरकारी नोकरी -
एनसीबी अंमली पदार्थ तस्करांना शोधण्यापेक्षा प्रसिद्ध व्यक्तींना लक्ष्य करून प्रसिद्धी मिळवत असल्याचा आरोप त्यांनी केला. वानखेडे मुस्लीम किंवा हिंदू असे दुहेरी जीवन जगत होते आणि त्यांनी बेकायदेशीरपणे अनुसूचित जाती SC श्रेणी अंतर्गत नोकरी मिळवली होती. ज्यामुळे खरे अनुसूचित जातीचे उमेदवार नोकरीपासून वंचित राहिले. वानखेडे यांनी बेकायदेशीरपणे सरकारी नोकरी कशी मिळवली हे दाखवण्यासाठीच धर्माचा उल्लेख केल्याचे आपण उपलब्ध रेकॉर्डवरून निदर्शनास आणून दिले होते. आपण केलेल्या आरोपामुळे समीर वानखेडे विरोधात एनसीबीला योग्य पाऊले उचलण्यास मदत झाली, असल्याचेही नवाब मलिक यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.