मुंबई - राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी आज आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र अहिर यांच्या या पक्षप्रवेशाची बोलणी लंडनमध्ये झाल्याचा खुलासा आदित्य ठाकरे यांनी स्वतः अहिर यांच्या पक्षप्रवेशा दरम्यान केला आहे.
अहिरांच्या पक्षप्रवेशासाठी आदित्य ठाकरे यांचे विशेष प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांना शिवबंधनात अडकवण्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. अहिर आणि ठाकरे यांच्यातील पक्ष प्रवेशाची बोलणी लंडनमध्ये एका हॉटेलमध्ये झाल्याची माहिती आहे. आमची भेट एका हॉटेलात जेवणाच्या वेळी झाल्याची माहिती आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेशा दरम्यान दिली.
लंडनमधील हॉटेल ते मातोश्री, असा झाला अहिरांचा प्रवास
लोकसभा निवडणुक झाल्यावर आदित्य ठाकरे मे महिन्यात लंडनमध्ये गेले होते. त्याच दरम्यान सचिन अहिर आपल्या पत्नीसह आदित्य यांना एका हॉटेलमध्ये भेटले. यावेळी शिवसेना प्रवेशाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समजते. या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होऊन दोघांमध्ये फोन मेसेजमध्ये संवाद सुरू झाला. यातूनच शिवसेनेच्या पक्ष प्रवेशाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.
शिवसेनेच्या कामाची पद्धत आवडल्याने पक्षप्रवेश
शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांवर टीका करणारे सचिन अहिर यांनी कामाची पद्धत आवडल्याने पक्षप्रवेश केल्याचे म्हटले. पहिल्यांदाच सचिन अहिर यांचा शिवसेना पक्ष प्रवेश आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून झाला. अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने आदित्य यांच्या नेतृत्वावर ही शिक्कामोर्तब झाले आहे.
नार्वेकरांची अनुपस्थिती ठरली चर्चेचा विषय
अहिर यांच्या पक्षप्रवेशावेळी मिलिंद नार्वेकरांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. नेहमी पक्ष प्रवेशाची जबाबदारी घेणारे उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यावेळी मात्र अनुपस्थित होते, यामुळे मिलिंद नार्वेकर यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला होता.