मुंबई - मुंबईमधील करीरोड येथील अविघ्न पार्क या इमारतीला लागलेली आग विझवताना आग विझवणाऱ्या स्प्रिंकल मधून पाणी कमी प्रमाणात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याठिकाणी पाण्याचा दाब कमी का होता याची चौकशी केली जाईल अशी माहिती पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. उंच इमारती बनवताना त्यामध्ये अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चौकशी केली जाईल
करीरोड येथील अविघ्न पार्क या इमारतीमधील १९ व्या मजल्यावर गुरूवारी सकाळी ११.५० च्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. अरुण तिवारी असे या व्यक्तीचे नाव असून तो ३० वर्षाचा होता. या घटनास्थळाला आदित्य ठाकरे यांनी दुपारी भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना, हायराईज इमारतीला लागलेली आग ही दुर्दैवी घटना आहे. आग का लागली तसेच यात काही कमी होती का याची चौकशी केली जाईल. चौकशीनंतर चूक कोणाची हे कळेल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. आग विझवताना इमारतीमधील आग विझवणाऱ्या स्प्रिंकलमधून पाणी कमी प्रमाणात येत होते. स्प्रिंकलमधील पाण्याचा दाब कमी का होता याची चौकशी केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
अग्निशमन दलाच्या यंत्रणामध्ये सुधार
या इमाररतीमधील सर्वच फ्लॅटसमध्ये रहिवाशी नव्हते. काही फ्लॅटसमध्ये काम चालू आहे. नागरिकांनी घरे घेताना इमारतीमध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे का हे बघावे असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. या आगीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तो त्या इमारतीचा वॉचमन असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पालिकेने अग्निशमन दलाच्या यंत्रणामध्ये सुधार केले आहेत यामुळे आज अनेक जीव वाचले आहेत. आगीच्या घटना रोखण्यासाठी आग रोधक यंत्रणा आणि हायड्रन्ट असणे गरजेचे आहे. आग लागल्यावर धांदल उडून जाते म्हणून पोलीस आणि अग्निशमन दलाला काम करता यावे म्हणून आम्ही उशिरा येतो असेही ते म्हणाले.
हेही वाचा - VIDEO : थरारक! आग लागलेल्या इमारतीहून खाली कोसळली एक व्यक्ती