मुंबई - 'इंडियन आयडल १२' या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने अलिबाग विषयी केलेल्या वक्तव्यानंतर फेसबुकवर पोस्ट टाकून माफी मागितली आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर राजकीय पक्षांसह अलिबागकरांनी संताप व्यक्त केला होता. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपटसेनेने त्याला उद्धटपणा कमी करण्याचा सल्ला दिला होता. असे न केल्यास गंभीर परिणाम होती, असेही मनसे नेते अमेय खोपकर यांनी सांगितले होते.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आदित्य नारायणला इशारा दिला होता. त्यानंतर आदित्यने फेसबुक पोस्ट करत अलिबागकरांची माफी मागितली आहे. आदित्य नारायण म्हणतो की, 'मी नम्रपणे हात जोडून अलिबागच्या लोकांची माफी मागतो. माझ्या अलीकडच्या एपिसोडमध्ये मी अलिबागबद्दल जे विधान केले त्यावरून अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा कधीही कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता मला अलिबागबद्दल प्रेम आणि आदर आहे. माझ्याही अलिबाग ठिकाणाशी अनेक भावना जोडलेल्या आहेत. तिथले लोक आणि मातीचा मला आदर आहे' असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
'इंडियन आयडल १२' कार्यक्रमाच्या अलिकडेच प्रसारित झालेल्या भागात आदित्यने अलिबागवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. या कार्यक्रमातील एका स्पर्धकाचे गाणे संपल्यावर आदित्य त्याला म्हणाला, 'रागदारीचा नीट अभ्यास करून येत जा... आम्ही काय अलिबागवरून येथे आलो आहोत का?' असे सुनावले. आदित्यने जाहीरपणे कार्यक्रमात असे वक्तव्य केल्यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. अलिबागबद्दल अशा पद्धतीने जाहीरपणे, एका चॅनेलवरील कार्यक्रमात असा उल्लेख करण्यात आल्याने मनसेने त्याला खडेबोल सुनावले होते.
मनसेने दिला होता इशारा -
आदित्यचा उद्धटपणा वाढत चालला आहे. त्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. पण अलिबागच्या लोकांचा आणि अलिबागचा अपमान सहन केला जाणार नाही. सोनी वाहिनीने आगामी भागामध्ये अलिबाग येथील नागरिकांची माफी मागावी. यापुढे 'मै अलिबाग से आया हू क्या' असे कोणत्याही चॅनेलवर ऐकू आलं तर पत्र, विनंती, लाइव्ह नाही थेट कानाखाली आवाज काढणार, असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला होता.