मुंबई - काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या आणि निवडणुकीनंतर काँग्रेसला रामराम ठोकणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याची अधिकृत माहिती शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे. विधान परिषदेसाठीही उर्मिला मातोंडकर यांचे नाव राज्यपालांकडे पाठवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार आहेत.
मातोंडकर शिवसेनेतच
उर्मिला मातोंडकर या शिवसेनेतच असून त्या उद्या मंगळवारी प्रवेश करतील अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकारांबरोबर बोलताना दिली. अनेक दिवसांपासून त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्या सोमवारी प्रवेश करतील असेही ठरले होते. अखेर त्या उद्या प्रेवश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाने शिवसेना महिला आघाडी अजून भक्कम होईल असेही राऊत म्हणाले.
शिवसनेते करणार प्रवेश
विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. यांपैकी एका जागेसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांचे नाव दिले आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या सदस्यात्वाचा राजीनामा देत राजकारणापासून दूर गेलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
या नावांची शिफारस
विधान परिषदेच्या १२ नावांमध्ये काँग्रेसकडून सचिन सावंत, रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन, अनिरुद्ध वणगे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.