मुंबई - झाडे कापून आपण आपले आयुष्य कमी करत आहोत. त्यामुळे झाडे कापू नका त्यांचे रक्षण करा, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन यांनी मुंबईकरांना केले आहे. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या फुल आणि झाडांच्या प्रदर्शनाला भेट दिल्यावर त्यांनी हे आवाहन केले आहे.
मुंबई महापालिकेकडून भायखळा येथील राणीबागेत दरवर्षी फुल आणि झाडांचे प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनामध्ये गेट वे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट, बेस्टची पहिली बस असलेली ट्राम, कापड गिरणी, चिमणी, पेंग्विन, चित्रनगरीचे प्रतीक असलेला कॅमेरा, मुंबईचा डबेवाला यांच्या पानां-फुलांपासून बनलेल्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. विविध फुल आणि भाज्यांची झाडे या ठिकाणी पहावयास उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या प्रदर्शनाला सुप्रसिद्ध सिने तारका रविना टंडन यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान प्रदर्शन आणि साकारण्यात आलेल्या कलाकृतींचे त्यांनी कौतुक केले. प्रदर्शन ठिकाणी पालिका शाळांमधील विद्यार्थिनी कथ्थक नृत्य करत होत्या. त्यांची त्यांनी आवर्जून विचारपूस केली.
यावेळी बोलताना उद्यान विभागाच्या निमंत्रणानुसार मी इथे आले आहे. या ठिकाणी मुंबईकरांना मोठया स्फूर्तीने याठिकाणी पाहून आनंद होत आहे. गेले 25 वर्ष हे प्रदर्शन आयोजित केले जाते. प्रदर्शनात मुंबईचे वैभव साकारण्यात आले आहे. ते पाहून लहान मुलेही आनंद घेत आहेत. आपल्या आरोग्य आणि श्वास घेण्यासाठी झाड हिरवळ मुंबईसाठी महत्वाची आहे. झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. झाड कापून आपण आपले आयुष्य कमी करत आहोत, याची जनजागृती करण्याची गरज आहे असे रविना टंडन म्हणाल्या. मुंबईकरांनी झाडे तोडू नयेत असे आवाहन त्यांनी यावेळी मुंबईकरांना केले. :