मुंबई - अभिनेत्री केतकी चितळे ( actress Ketki Chitale ) हिने मुंबई उच्च न्यायालयात आज (गुरुवार) याचिका दाखल केली ( Bombay High Court ) आहे. आपल्याला झालेली अटक बेकायदेशीर असल्याचे तिने याचिकेत म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणात 15 मे रोजी अटक करण्यात आली होती.
यापूर्वीही केला होता अर्ज - अभिनेत्री केतकी चितळेला 15 मे रोजी अटक करण्यात आली होती. कळवा पोलीस स्टेशनमध्ये चितळेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या नंतर मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या केतकी चितळे न्यायालयीन कोठडीत आहे. केतकीने कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी जामीन मिळवण्यासाठी वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर याआधी ठाणे सत्र न्यायालयाने आपला निर्णय देत केतकीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. केतकीवर दाखल गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे तिचा जामीन नामंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
पोलीस कोठडी आज संपणार - केतकी चितळेने फेसबुकवर शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह बदनामीकारक आणि मानहानी करणारी पोस्ट लिहिली होती. तसेच संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा उल्लेख करून बदनामी केली होती. याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी देखील याचा निषेध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. सध्या ती तुरुंगात असून तिला सुनावण्यात आलेली पोलीस कोठडी आज संपत आहे. अजूनही तिच्यावर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरुच आहे.
केतकीवर आतापर्यंत कुठे कुठे गुन्हे दाखल? - अंबाजोगाई बरोबरच कळवा पोलीस ठाण्यात देखील केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव, नाशिक, पवई, पुणे, आमरावती आणि पिंपरी चिंडवड येथे देखील केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मी पोस्ट डिलीट करणार नाही - केतकीचा युक्तीवाद - केतकीने कोर्टात युक्तीवाद करताना म्हटले होते की ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिने केला होता. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही. तिने स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीने सांगितले की, मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असेही तिने कोर्टासमोर म्हटले होते.
हेही वाचा - मुंबईमधील बलात्कार पीडितेला दाऊदच्या नावाने धमकी ?