मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे आज पुन्हा चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. कालप्रमाणेच आजदेखील अनन्या दिलेल्या वेळेपेक्षा साडेतीन तास उशिराने एनसीबी कार्यालयात दाखल झाली असून चौकशी सुरू झाली आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर येत्या मंगळवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सध्या एनसीबी हायकोर्टात आणखीन ठोस बाजू मांडण्यासाठी प्रयत्न करत आहे. बुधवारी एनसीबीने कोर्टात दाखल केलेल्या आर्यनच्या whats app चॅटमध्ये एका बॉलिवूडच्या नवोदित अभिनेत्रीचे नाव असल्याचे समोर आले होते. त्यानंतर गुरुवारी ही अभिनेत्री कोण आहे याचा खुलासा झाला. बॉलिवूडमधील नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे हिचे नाव आर्यनच्या whats app मध्ये आढळले. यात ड्रग्ज संबंधित बातचीत केल्यामुळे अनन्याला एनसीबीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहायला सांगितले. काल अनन्याची एनसीबीकडून २ तास चौकशी केल्यानंतर आजही तिची पुन्हा चौकशी सुरु आहे.
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यनचा whats app चॅट -
आजच्या सुनावणीपूर्वी या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीच्या हाती आर्यन खानचे काही चॅट्स लागले आहेत. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानसोबत बॉलिवूडची एक नवखी अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. चॅट्समध्ये अभिनेत्रीसोबत आर्यन खानची ड्रगबाबत चर्चा झाली होती. कोर्टात सुनावणी दरम्यान एनसीबीने ज्या आरोपींचे चॅट्स सादर केले होते, त्यामध्ये आर्यन खानसह या अभिनेत्रीच्याही चॅट्सचा समावेश आहे.
कधी झाली अटक?
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एम. नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
whats app चॅटमधील ड्रग्ज पेडलर -
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणासंदर्भात एनसीबी अजूनही ठिकठिकाणी कारवाया करत आहे. काल, गुरुवारी उशिरा रात्री एनसीबीने कारवाई करून एका २४ वर्षीय ड्रग्ज पेडलरला ताब्यात घेतले आहे. या ड्रग्ज पेडलरचं नाव ड्रग्ज संबंधित whats app चॅटमधून समोर आलं. त्यामुळे हा पेडलर याप्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या एनसीबी आर्यन खानसह इतरांना जामीन न मिळण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच आज पुन्हा एनसीबीकडून बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी होत आहे. त्यापूर्वीच एनसीबीने whats app चॅटमध्ये नाव असलेल्या आणखीन एका व्यक्तीवर कारवाई केली आहे. काल रात्री एनसीबीने या व्यक्तीवर कारवाई केली. हा व्यक्ती २४ वर्षीय ड्रग्ज पेडलर असून याप्रकरणातील प्रमुख संशयित असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे.