मुंबई - गेल्या दोन दिवसात शिवसेनेच्या तीन नेत्यांवर ईडी (सक्तवसुली संचालनालय) चौकशीच्या फेर्या सुरू आहेत. मंत्री अनंत परब, खासदार भावना गवळी आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ हे ईडीच्या रडारवर असून शिवसेना नेत्यांच्या या चौकशीमुळे ठाकरे सरकारची प्रतिमा राजकीय वर्तुळात मलिन होत का? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
नेत्यांच्या अडचणीत वाढ -
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांवर एकामागून एक आरोप केले जात आहेत. खास करून भारतीय जनता पार्टीच्या निशाण्यावर शिवसेना पक्ष रडारवर असलेला पाहायला मिळतोय. शिवसेनेचे मंत्री, नेते, आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पार्टीच्या निशाणावर असून एकामागून एक नेत्यांच्या अडचणीत वाढ होतानाच दिसते. आज शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागले आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर देखील ईडीची कारवाई झालेली पाहायला मिळाली.
सरकारची प्रतिमा जनसामान्यात मलिन करण्याचा प्रयत्न -
गेल्या दोन दिवसांमध्ये शिवसेनेच्या तीन नेत्यांवर ईडी (सक्तवसुली संचालनालय) कडून कारवाई होत असून, याचा फटका ठाकरे सरकारच्या प्रतिमेला बसताना दिसतोय. मात्र कितीही प्रयत्न करून राज्यामध्ये सत्तापालट होताना दिसत नसल्याने भारतीय जनता पार्टीने आता आरोपांच्या फेऱ्या शिवसेनेच्या नेत्यांवर सुरू केले असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षाकडून अनेक प्रयत्न झाले. मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील नेत्यांवर भारतीय जनता पार्टीने आपला मोर्चा वळवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांवर आता आरोपाच्या फेऱ्यात केल्या जात आहेत. राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये याचा फटका आघाडी सरकारला बसावा आणि सरकारची प्रतिमा जनसामान्यात मलिन व्हावी, असा विरोधी पक्षाचा प्रयत्न आहे असे मत विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.
तपास यंत्रणेच्या रडारवर असलेले शिवसेनेचे नेते -
अनिल परब -
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी (सक्तवसुली संचालनालय) कडून दोन वेळा समन्स बजावण्यात आले. त्यानंतर अनिल परब हे आज (28 सप्टेंबर) रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. अनिल परब यांनी लॉकडाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे १० कोटींचा बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा आरोप खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे. याबाबत किरीट सोमैय्या यांच्याकडून सीबीआय आणि आयकर विभागाकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. तसेच वेळोवेळी सचिन वाझे प्रकरणात देखील अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांच्याकडून करण्यात आला आहे.
आनंदराव अडसूळ -
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना 27 सप्टेंबर रोजी ईडीने ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर तब्येत बिघडल्याच्या कारणास्तव आनंदराव अडसूळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आनंदराव अडसूळ हे सहकार क्षेत्रातील एक मोठे नाव म्हणून गणले जातात. मात्र आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत 900 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. याच घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरु असून आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्याही अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
प्रताप सरनाईक -
प्रताप सरनाईक यांनी एनएसईएलमध्ये अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या घोटाळ्यांच्या पैशातून त्यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला. याबाबत ईडीकडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या आणि मुंबईच्या अशा दोन्ही घरांवर छापेमारी करण्यात आली. याबाबत वेळोवेळी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांना देण्यात आले आहेत.
रवींद्र वायकर -
रविंद्र वायकर यांनी अलिबागमधील कोलई गावात अन्वय नाईक यांच्याकडून ३० जमिनीचे करार करण्यात आले. जमिनीचे करार, ग्रामपंचायतमध्ये केलेले अर्ज, रजिस्ट्रेशन, त्यांच्यावरील १९ बंगले याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केलाय. 19 बंगल्यांची प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी रविंद्र वायकर यांच्या पत्नीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या प्रतिज्ञापत्रमध्ये काहीही उल्लेख केलेला नाही. या प्रॉपर्टीबाबत रवींद्र वायकर आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
भावना गवळी -
भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष ट्रस्टचे परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये केले. हे परिवर्तन करत असताना भावना गवळी यांनी खोटी कागदपत्र सादर केली. खोटी कागदपत्रे सादर करून ट्रस्टचे रूपांतर कंपनीमध्ये केले असा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. हा घोटाळा जवळपास शंभर कोटी असल्याचा अंदाजही किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केला आहे. याबाबत कारवाई करत ईडीकडून आज (28 सप्टेंबर रोजी) सईद खान या संचालकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर भावना गवळी यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर -
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत येणाऱ्या सनदीकामधून मुंबईतील जवळपास सहा फ्लॅट लाटल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. 2003 साली झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत वरळीमध्ये देण्यात आलेल्या 230 फ्लॅटमधील सहा फ्लॅट किशोरी पेडणेकर यांनी घेतले. यावेळी किशोरी पेडणेकर या प्रभागांमध्ये नगरसेविका होत्या. त्यावेळेस हा अपहार झाल्याचे किरीट सोमैय्या यांचा आरोप आहे. तसेच कोविड काळामध्ये महानगरपालिकेंतर्गत कोविड सेंटर उभारण्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचाही आरोप किरीट सोमैय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर केला आहे.
यशवंत जाधव आणि यामिनी जाधव -
मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी दुबईत असलेल्या 'सिनर्जीत व्हेंचर्स' आणि 'सईद डोन शारजा' या दोन कंपन्या तयार करून त्यात पैशांची गुंतवणूक केली आहे. या दोन्ही कंपन्या यशवंत जाधव कुटुंबीयांच्या असल्याचा दावाही किरीट सोमैय्या यांनी केला आहे. या कंपनीत पैसा लावण्यासाठी प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जाधव यांना पैसे दिले. प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोलकत्त्यामधील मनी लॉन्ड्रिंग करणारी कंपनी असल्याचाही आरोप या वेळी किरीट सोमैय्या यांनी केला आहेत. हा काळा पैसा नेमका यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांनी कोठून आणला? असा सवाल किरीट सोमैय्या यांनी उपस्थित केला. मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड उपचारासाठी जे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते, तसेच इतर बाबतीत जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. त्या कॉन्टॅक्टमधून केलेल्या काळा बाजारातून हा पैसा उभा करण्यात आला. त्यानंतर या काळ्या पैशाला मनी लॉन्ड्रिंग करून दुबईत गुंतवणूक करण्यात आली आहे. जवळपास पंधरा कोटी रुपये दुबईच्या या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याचा संशय किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केला आहे.
मिलिंद नार्वेकर -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी दापोली समुद्रकिनाऱ्याजवळ अनाधिकृत बंगला बांधला असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्याची मंत्रालयात जाऊन भेट घेऊन त्याबाबत सविस्तर माहिती दिली असल्याचे किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या नंतर मिलिंद नार्वेकर यांनी बांधलेला अनधिकृत बंगला पाडला जाईल, असे आश्वासन त्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले असल्याचे किरीट सोमैय्या यांनी सांगितले आहे. तसेच हा बंगला बांधण्याआधी मिलिंद नार्वेकर यांनी परवानगी घेतली नव्हती, असेही किरीट सोमैय्या यांनी सांगितले होते.
हेही वाचा - कोल्हापूर : सात दिवसात एफआयआर दाखल करा; अन्यथा न्यायालयात, किरीट सोमैयांचा इशारा