मुंबई - शहरात गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाच्या तीन लाटा आल्या असून ओमायक्रॉन या व्हेरियंटचे रुग्ण (Omicron Variant in Mumbai) आढळून आले आहेत. विषाणूचा हा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरही जे नागरिक मास्क घालत नाहीत अशा नागरिकांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. रेल्वे प्रवाशांवर मुंबई महानगरपालिका, क्लिनअप मार्शल तसेच पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या ७२७ दिवसात तब्बल ४६ लाख १९ हजार ७५० विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत ९१ कोटी ८७ लाख ८४ हजार ०७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
४६ लाख नागरिकांवर कारवाई
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर विषाणूचा झपाट्याने प्रसार झाल्याने एप्रिल महिन्यापासून नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली. १७ एप्रिल २०२० ते २८ मार्च २०२२ या ७२७ दिवसात ४६ लाख १९ हजार ७५० विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत ९१ कोटी ८७ लाख ८४ हजार ०७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने ३६ लाख ८० हजार ०५२ नागरिकांवर कारवाई करत ७३ कोटी ८ लाख ४४ हजार ४७५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई पोलिसांनी ९ लाख १५ हजार ८०७ नागरिकांवर कारवाई करत १८ कोटी ३१ लाख ६१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर रेल्वेमध्ये २३ हजार ८९१ नागरिकांवर कारवाई करून ४७ लाख ७८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा त्रिसूत्रीचे पालन करा
कोरोना किंवा इतर कोणत्याही विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी लस घेतली असली किंवा त्यांच्यामध्ये अँटोबॉडीज निर्माण झाल्या असल्या तरी त्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. अशा नागरिकांना सौम्य लक्षणे होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.
हेही वाचा - Library in Umarga : उमरगा येथे ''पान टपरी नव्हे ज्ञान टपरी''ची स्थापना; वकिलाचा अनोखा उपक्रम