मुंबई - दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. मुंबईत गेल्या ५ वर्षात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या १८ ते २० वर्षे वयोगटातील १ हजार ८५४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १३८ कोटी ८६ लाख ५९ हजार २२४ रुपये एवढा दंड वसूल केला आहे. २०१७ च्या काळात हाच दंड ८५ कोटी ७८ लाख ६० हजार ३५५ रुपये एवढा वसूल करण्यात आला होता. वाहतूक पोलिसांना देण्यात आलेल्या ई चलन कार्यप्रणालीमुळे वाहतूक पोलीस विभागात भ्रष्टाचार कमी होऊन मद्यपी वाहनचालकांवर व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली गेल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.
हेही वाचा - मुंबईतील १६ पुलांवरील 'भार' पालिका कमी करणार
२०१५ मध्ये तब्बल १८ हजार ०३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. हेच प्रमाण २०१६ मध्ये वाढत मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या २० हजार ७६८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. २०१७ मध्ये १७ हजार ९३१ मद्यापी वाहनचालकांवर कारवाई झाली असून २०१८ मध्ये यात सर्वाधिक घट होत ११ हजार ६६२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - गणपती उत्सवापूर्वीच शिक्षकांच्या खात्यांवर होणार पगार जमा
महत्वाचे म्हणजे सन २०१५ पासून जुलै २०१९ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांचे वय हे १८ ते २० वर्ष वयोगटातील आहेत. यात तब्बल १ हजार ८५४ जणांवर कारवाई झाली आहे, तर मद्यपी महिला वाहनचालकांचे प्रमाण आहे तब्बल ३६७. गेल्या पाच वर्षात मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या १० हजार ७०२ वाहनचालकांचे व्हॅन परवाने रद्द करण्यात आले आहेत.