मुंबई : ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने 4 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश यू. जे. मोरे यांनी निकाल देताना असे निरीक्षण नोंदवले की, पोलिसांवर होणारे हल्ले काही नवे नाहीत. मात्र, पोलिसांवर होणारे हल्ले हे कायदा सुव्यवस्थेवर झालेल्या हल्लासारखे आहेत, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने आरोपीला तब्बल 11 वर्षांनंतर शुक्रवारी शिक्षा ठोठावली.
10 मार्च 2011 साली सायन रेल्वे स्थानकानजीक असलेल्या एका एटीएमजवळ दोघा जणांचे रात्री 2 च्या सुमारास भांडण सुरू होते. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदार कल्पेश मोकल आणि पोलीस शिपाई कांबळे हे भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी अनिल घोलप याने पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी घोलप व त्याचा साथीदार महेश चिन्नपाई विरोधात पोलिसांनी आयपीसी 353, 332, 504 व 34 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
आरोपी चिन्नपाई याचे निधन झाले, तर घोलप विरोधात खटला दाखल करण्यात आला. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश यु. जे. मोरे यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीवेळी पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत आरोपीला चार वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी काही महिन्यांची शिक्षा तसेच दंडाची रक्कम भरल्यास ती रक्कम तक्रारदार पोलीस हवालदार कल्पेश मोकल यांना द्यावी, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
पोलीस दिवस-रात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात. अलीकडच्या काळामध्ये पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अलीकडच्या काळात अशा घटना वाढत आहेत ही गंभीर बाब आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करणार्या पोलिसांवर होणारा हल्ला म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेवर होणारा हल्ला आहे. अशा प्रकारे हल्ले करण्याची हिम्मत होत असेल, तर ती न्यायाची थट्टा होईल. अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून आरोपीला शिक्षा ठोठावणे गरजेचे आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
हेही वाचा : Pune Crime : येरवडा परिसरात सराईत गुन्हेगारासह नागरिकांचा पोलिसांवर हल्ला