मुंबई - मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी करण्यासाठी लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरणाला वाढत प्रतिसाद बघता मुंबई महापालिकेने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याचा विचार सुरू केला आहे. मुंबईत सध्या ६५ लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू असून ही संख्या १०० वर नेण्याचा विचार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत कोरोना आणि लसीकरण -
मुंबईत गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 34 हजार 572 वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा 11 हजार 504 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 11 हजार 407 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 10 हजार 779 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 3 लाख 90 हजार 938 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 1 लाख 62 हजार 598 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 11 हजार 78 फ्रंटलाईन वर्कर, 1 लाख 5 हजार 867 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वयातील गंभीर आजार असलेल्या 11 हजार 395 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
केंद्रांची संख्या वाढवणार -
मुंबईत वाढत प्रतिसाद पाहता लसीकरण केंद्र वाढवण्याचा विचार सुरू आहे. तसे पत्र केंद्र सरकारला देण्यात आले आहे. मुंबईत सध्या महापालिकेची २४, राज्यशासनाची ४ तर खासगी ३७ अशा एकूण ६५ लसीकरण केंद्रांवर लस दिली जात आहे. त्यात वाढ करून ८५ खासगी आणि पालिका तसेच सरकारी ५० रुग्णालयात लसीकरण सुरू करण्याचा विचार आहे. मुंबईत सध्या तिसऱ्या टप्प्यातील जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. या वयोगटातील लसीकरण करून घेणाऱ्या लाभार्थ्यांचा आकडा मोठा असल्याने केंद्र वाढवल्यास हा टप्पा लवकर पूर्ण करता येणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचा टप्पा लवकरच पूर्ण होईल, असे काकाणी यांनी सांगितले. मुंबईत लसीचा साठा योग्य प्रमाणात असून दर आठवड्याला त्याचा आढावा घेतला जात असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
हेही वाचा - आयसीसी वनडे क्रमवारी : हरमनप्रीत कौर १७व्या स्थानी