मुंबई - भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीच्या कमरेखाली हात लावणं म्हणजे तिच्या शालीनतेला हात घालणंच. त्यामुळे तो गुन्हाच आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायधीश अभिजीत नांदगावकर यांनी एका प्रकरणात 10 वर्षीय मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केल्याच्या आरोपाखाली एका 22 वर्षीय आरोपीला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणातील निकाल देताना नोंदवले निरीक्षण
या प्रकरणात आरोपीने तक्रारदार मुलीच्या खासगी भागाला हात लावल्याचा आरोप केला आहे़. मात्र, तिचा पार्श्वभाग हा खासगी भागाच्या कक्षेत मोडत नाही. कारण गुगलवरही पार्श्वभागाचा 'खासगी भाग' असा अर्थ काढण्यात आलेला नाही, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. त्यावर न्यायालयाने पोक्सो कायद्यातील कलम 7 चा संदर्भ दिला. या कलमातील लैंगिक शोषणासंबंधातील तरतुदींनुसार, जर महिलेच्या कोणत्याही अवयवाला स्पर्श केला असेल तर तो लैंगिक हेतूनेच असला पाहिजे. त्यामुळे मुलीच्या पार्श्वभागाला केलेल्या स्पर्शामागे आरोपीची लैंगिक भावना नव्हती असा दावा करता येणार नाही. तसेच गुगलमध्ये जरी हा भाग खासगी म्हटला नसला तरी, भारतीय संस्कृतीनुसार स्त्रीच्या कमरेखाली हात लावणे म्हणजे तिच्या शालीनतेला हात घालणेच आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. आरोपीने लैंगिक भावना मनात ठेवूनच या मुलीच्या पार्श्वभागाला हात लावल्याचे सिद्ध होत आहे, असेही न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले आहे.
हेही वाचा - नागरिकांशी कसे वागायचे व बोलायचे, क्लिनअप मार्शलला प्रशिक्षण दिले जाईल - महापौर