मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता जाणवत आहे. मुंबईत आयसीयूचे 41 तर व्हेंटिलेटरचे फक्त 15 बेड रिक्त आहेत. यामुळे आयसीयू आणि व्हेंटिलेटरच्या बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. यासाठी येत्या 15 दिवसात 4 जम्बो कोविड सेंटर उभारली जाणार आहेत. त्यात 5 हजार 300 बेड आणि 800 आयसीयू असणार आहेत. मरिन ड्राईव्ह येथील इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल व बिकेसी येथील ट्रायडंट हॉटेल ताब्यात घेतले आहे.
आयसीयू, व्हेंटिलेटरचा तुटवडा
14 एप्रिलच्या आकडेवारीनुसार जम्बो कोविड सेंटर व इतर कोविड सेंटरमध्ये एकूण 26 हजार 872 खाटा आहेत. त्यापैकी 20 हजार 890 खाटांवर रुग्ण असून 5 हजार 982 खाटा रिक्त आहेत. पालिका सरकारी रुग्णालयात 20 हजार 22 खाटा आहेत. त्यापैकी 15 हजार 917 खाटांवर रुग्ण असून, 4 हजार 105 खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजनच्या 10 हजार 361 खाटा आहेत. त्यापैकी 8 हजार 917 खाटांवर रुग्ण असून 1 हजार 444 खाटा रिक्त आहेत. आयसीयूच्या 2 हजार 664 खाटा आहेत. त्यापैकी 2 हजार 623 खाटांवर रुग्ण असून, 41 आयसीयू बेड रिक्त आहेत. व्हेंटिलेटरच्या 1 हजार 339 खाटा आहेत. त्यापैकी 1 हजार 324 बेडवर रुग्ण असून, 15 बेड रिक्त आहेत. मुंबईत आयसीयूच्या आणि व्हेंटीलेटरच्या खाटा कमी प्रमाणात रिक्त आहेत. मात्र कोविड सेंटर, पालिका रुग्णालय, सरकारी रुग्णालयात १० हजार खाटा रिक्त आहेत, त्यात ऑक्सिजनच्या 1 हजार 444 खाटा रिक्त आहेत.
रेमडेसिविरचा मुबलक साठा
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे या इंजेक्शनचा राज्यात तुटवडा आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. मात्र मुंबई महापालिकेकडे 22 हजार रेमडेसिविर इजेक्शनचा साठा आहे. तर 2 लाख इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली आहे. हे इंजेक्शन जास्त किमतीत खरेदी केले जात असून, त्यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. तर 'असा घोटाळा झाला नाही. इतर राज्यात ज्या किमतीला हे इंजेक्शन मिळते तितक्याच किमतीत खरेदी करण्यात येत आहे' असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
ऑक्सिजनचा योग्य पुरवठा
मुंबईत रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. यासाठी पालिकेने ऑक्सिजन सिलेंडर ऐवजी मोठे टॅंक बसवले आहेत. मुंबई महापालिकेला एकच पुरवठादार ऑक्सिजनचा पुरवठा करत होता. आता तीन पुरवठादारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे पालिकेकडे कोणत्याही प्रकारे ऑक्सिजनची कमतरता राहणार नाही.
87 हजार 443 सक्रिय रुग्ण
14 एप्रिलच्या आकडेवारीनुसार मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 44 हजार 942 वर पोहचला आहे. मृतांचा आकडा 12 हजार 140 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 44 हजार 214 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 87 हजार 443 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 40 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 90 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. 995 इमारती या रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 47 लाख 55 हजार 733 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट
मुंबईत बांद्रा, गोरेगाव, बोरीवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर घाटकोपर आदी भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता या विभागात विशेष उपाययोजना राबवल्या जात आहेत.
17 लाख 96 हजार लाभार्थ्यांना लस
मुंबईत आतापर्यंत एकूण 17 लाख 96 हजार 686 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 15 लाख 86 हजार 384 लाभार्थ्यांना पहिला, तर 2 लाख 10 हजार 310 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 61 हजार 91 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 86 हजार 440 फ्रंटलाइन वर्कर, 7 लाख 2 हजार 138 ज्येष्ठ नागरिक, तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 5 लाख 47 हजार 17 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
कोविड सेंटरमध्ये बेडची संख्या वाढणार
कांजूरमार्ग येथे एमएमआरडीए 2 हजार बेडचे कोविड सेंटर उभारले जाणार आहे. त्यात आयसीयूचे 200 बेड असतील. मालाडच्या रहेजा ग्राऊंडवर सिडकोकडून कोविड सेंटर उभारले जाणार आहे. त्यात 2 हजार बेड असून 200 आयसीयू बेड असतील. चुनाभट्टी येथे सोमय्या ग्राऊंडवर म्हाडाचे 1 हजार बेडचे कोविड सेंटर उभारले जाणार असून, त्यात 200 आयसीयू असतील. महालक्ष्मी येथे 3 हजार बेडचे कोविड सेंटर उभारले जाणार असून, त्यात 200 आयसीयू बेड असतील. या चार ठिकाणी येत्या 15 दिवसात जंबो कोविड सेंटर उभारली जाणार आहेत. त्यात 5300 बेड तर 800 आयसीयू उपलब्ध होतील.
बेड्स वाढवणार
बेड्स कमी पडू नये म्हणून जसलोक या खासगी हॉस्पिटलमधील 250 बेड ताब्यात घेतेले जाणार आहेत. त्यात 40 बेड आयसीयूचे आहेत. अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात 30 आयसीयू बेड वाढवले जाणार आहेत. गोरेगाव नेस्को येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये 1 हजार 500 बेड वाढवणार त्यातील बहुतेक बेड हे ऑक्सिजनचे असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली.
उपचारासाठी पंचतारांकित हॉटेल ताब्यात
मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारीपासून पुन्हा रूग्णांचा संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे बेड्सची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे ज्या रूग्णांवर रुग्णालयात उपचार करण्याची आवश्यकता नाही, अशा रूग्णांना हॉटेलमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तर, ज्यांना लक्षणे आहेत, ऑक्सिजन, आयसीयू तसेच व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे, अशा रुग्णांचा रूग्णालयात उपचार केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने मरिन ड्राइव्ह येथील इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल व बिकेसी येथील ट्रायडंट हॉटेल ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - कोरोनाचा रेल्वेला फटका : प्रवासी नसल्याने राज्यांतर्गत 3 विशेष एक्स्प्रेस गाड्या रद्द