मुंबई - मुंबईतील 1993 बॉम्ब स्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला दहशतवादी अबू बकरला यूएईतून अटक करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अबू बकरला पकडण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणेला मोठं यश आलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अबू बकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा साथीदार असून गेल्या २९ वर्षांपासून तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. त्याच्याविरुद्ध १९९७ मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे अबू बकर याला याआधी २०१९ मध्येही अटक करण्यात आली होती. त्यावेळी काही दस्तावेजांच्या त्रुटीमुळे त्याची यूएईत सुटका झाली होती.
मुंबईतील 1993 साखळी बॉम्ब स्फोट हल्ल्यात ( Mumbai Serial Bomb Blast 1993 ) वापरण्यात आलेलं आरडीएक्सचं लॅन्डिंग आणि दाऊबसोबत दुबईतून कट रचण्यात बकरचा हात असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. मुंबईतील 1993 साली झालेल्या 12 साखळी बॉम्ब स्फोट घडवण्यात आले होते. तब्बल 257 लोक या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते. तर 700 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. तब्बल 29 वर्षानंतर अबू बकर नावाचा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी भारतीय यंत्रणांच्या हाती लागला असल्याचं माहिती सूत्रांनी दिले आहे. अबू बकरला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात मुंबई दलातील अधिकार्यांशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
कोण आहे अबू बकर?
अबू बकर यांचं पूर्ण नाव अबू अब्दुल गफूर शेख आहे. अबू हा दाऊद इब्राहिमचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. दाऊदचे प्रमुख लेफ्टनंट मोहम्मद आणि मुस्तफा डोसा यांच्यासोबत अबू तस्करीत सामील होता. त्याने आखाती देशांमधून सोनं, कपडे आणि इलेक्रॉनिक्स वस्तूंची तस्करी मुंबईत केल्याचा आरोप आहे. 1997 मध्ये त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. अबूने दुबईतीलच एका इराणी मुलीशी लग्न केलं आहे. अबू बकरचे दुबईतील अनेक व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याचेही सांगितलं जाते. सध्या अबूच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे.
1993 च्या हल्ल्याच्या कटू आठवणी -
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात तब्बल 257 लोकांचा जीव गेला होता. तर 713 जण गंभीररित्या जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात मुंबईतील एकूण 27 कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचं नुकसान झालं होतं. संपूर्ण देश 1993 मधील बॉम्ब ब्लास्टच्या घटनेने हादरुन गेला होता. मुंबईतील बॉम्बस्फोटाचा कट सुनियोजितपणे आखला गेला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा इशारा मिळाल्यानंतर मुंबईतील बॉम्बस्फोटांसाठी सर्वप्रथम लोकांची निवड करण्यात आली होती. या सगळ्यांना दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवून प्रशिक्षण देण्यात आलं होतं. तस्करीचे जाळे वापरून दाऊदने अरबी समुद्रमार्गे स्फोटके मुंबईत पोहोचवली होती. मुंबईतील विविध भागात सुमारे दोन तास हे स्फोट सुरू होते. या घटनेनं संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती.