मुंबई - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या इतरही जिल्हयात जनता दरबार घेण्याची मागणी एकीकडे युवासेना सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांना केली आहे. तर दुसरीकडे यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून याचा विरोध केला आहे. उदय सामंत यांच्या कार्यक्रम विद्यापीठाच्या खर्चातून केला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या पैशाचा अपव्यय होत आहे.
अभाविपाने केला विरोध -
राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरिता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 22 फेब्रुवारी 2021ला वरळी येथे जांबोरी मैदानावर शैक्षणिक समस्या सोडवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसोबत चर्चा संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा खर्च हा एसएनडीटी महिला विद्यापीठाने द्यावा असा आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिला आहे. त्याचा विरोध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे कडून करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या पैशाचा अपव्यय कशासाठी..?
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे गौतमी अहिरराव यांनी सांगितले आहे की, वरळी येथे जांबोरी मैदानावर उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाचा खर्च एसएनडीटी महिला महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाने द्यावा असा आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले होते. त्यामुळे आम्ही यांचा विरोध केला आहे. आता युवासेना सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाकडे मागणी केली की, उदय सामंत यांचे जनता दरबार इतरही जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाने आयोजन करावेत. त्यांच्याही आम्ही विरोधात करतोय, कारण राजकीय कार्यक्रमांना महाविद्यालय, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणे, विद्यार्थ्यांच्या पैशांतून वर्तमानपत्रात जाहिरात देणे त्याचसोबत होर्डिंग, बॅनर अशा विविध माध्यमातून स्वतःची प्रसिद्धी करवून घेणे हे चुकीचे आहे. विद्यापीठाच्या पैशाचा अपव्यय होत आहे.
युवासेना सिनेट सदस्यांच्या मागणी -
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या अनेक तक्रारीचे निवारण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा भवन येथे जनता दरबार घेऊन विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला होता. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा अशाच पद्धतीचे जनता दरबार घ्यावे जेणेकरून विद्यार्थी प्राध्यापक आणि शिक्षकांचे तक्रारीचे निवारण होईल. यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्याची मागणी युवा सेना सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांना केली आहे. मात्र युवासेना सिनेट सदस्यांच्या मागणीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून विरोध केलेला आहे.