मुंबई - मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझ येथे एका महिलेचा हात पकडून पिरगळला व धमकी दिली आहे. महापौर हे शिक्षक व मुंबईचे प्रथम नागरिक आहेत. त्यांनी अशा वेळी संयम तसेच सभ्यता पाळायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली आहे. तर मी असला गैरप्रकार केला नसल्याचा खुलासा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.
सांताक्रुझ वाकोला येथे मालानगम व संकेतनगम येथे माय-लेकांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. यानंतर परिसरात संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महापौर विश्वनाथ महाडेश्वर, स्थानिक आमदार तृप्ती सावंत व स्थानिक नगरसेविका प्रज्ञा भुतकर मृतांच्या परिवारास भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी महापौरांना अडवले. यावेळी नागरिक आणि महापौरांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या माहापौरांनी एका महिलेचा हात पिरगळला व 'ए तू मला ओळखत नाहीस का?' असे म्हणत तिला धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अशा वेळी संयम पाळला पाहिजे - रावी राजा
महापौर हे मुंबईचे प्रथम नागरिक आहेत. ते शिक्षक देखील आहेत. त्यांनी उत्तेजनामध्ये हा प्रकार केल्याचे दिसते. महापौरांना महिलांनी घेराव घातला असता त्यांनी संयम पाळायला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे.
मी काहीच केले नाही - महापौर
मला विरोध करणारे लोक मनसेचे कार्यकर्ते होते. त्यांनी इतर ठिकाणाहून कार्यकर्ते आणले होते. त्या भागात मनसेची ताकद नाही, म्हणून त्यांनी असे केले असावे. आई आणि मुलाचा मृत्यू झाला असताना असे राजकारण करावे आणि महापौर आले म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करावा ही बाब गंभीर आहे. मृत्यू झाला त्या ठिकाणी असे घाणेरडे राजकारण करणे, दादागिरी करणे ही गंभीर बाब आहे. मी त्याच भागात राहत होतो. त्याच भागाचा १० वर्ष नगरसेवक होतो. म्हणून मी त्या बाईला, मला तुम्ही ओळखत नाही का? असा असा प्रश्न उपस्थित केला. मी कोणाचाही हात पकडला नाही किंवा पिरगळला नाही, तसे असेल तर मला दाखवावे. अनावश्यक आरोप करून बदनाम करू नका, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा -