मुंबई - मुंबई महापालिकेच्या अख्यातरित्यातील राणीबाग म्हणजेच 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात' अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात आलेले सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पक्ष्यांचे नंदनवन, माकड प्रदर्शनी, 'बायोम' थीमवर आधारित उद्यान या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्याचे लोकार्पण महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात ( Aaditya Thackeray Inauguration BioTheme ) आले.
मुंबई महापालिका नागरिकांना सोयी सुविधा देताना त्यांच्या विरंगुळ्याचा प्राधान्याने विचार करत असते. याच भूमिकेतून उद्याने, प्राणीसंग्रहालये यासारखी विरंगुळ्याची विविध ठिकाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याच अनुषंगाने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आधुनिक प्रदर्शन कक्षांचे, 'बायोम' थीमवर आधारित उद्यानाचे आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणेचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज ( 17 एप्रिल ) करण्यात आले. याप्रसंगी आमदार यामिनी यशवंत जाधव, माजी महापौर किशोरी किशोर पेडणेकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉक्टर संजीव कुमार, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी नगरसेविका सोनम जामसुतकर, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे पाहणी करताना पक्ष्यांच्या नंदनवनात 'वॉक थ्रू' - नवीन तयार करण्यात आलेल्या पक्ष्यांच्या नंदनवनात 'वॉक थ्रू' सुविधेसह तयार करण्यात आलेली प्रदर्शनी अत्यंत भव्य आहे. काचेच्या गॅलरीमधून आतमधील तयार करण्यात आलेले नैसर्गिक अधिवास, पक्ष्यांकरिता विविध झाडे-झुडुपे, घरटी तयार करण्याच्या जागा, खेळणी, पाणी पिण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. युरोपियन तंत्रज्ञानावर आधारित 'स्टेनलेस स्टील वायरमेश'ची संरचना प्रदर्शनीच्या आच्छादनासाठी उभारण्यात आली आहे. या प्रदर्शनीमध्ये प्रामुख्याने धनेश, पोपट, सोनेरी तितर, मोर, कोकॅटेल, मिलिटरी मकाऊ, आफ्रिकन करडा पोपट आदी पक्षी आहेत. पक्ष्यांविषयीची रंजक आणि जीवशास्त्रीय माहिती देणाऱ्या बाबी समाविष्ट असलेले फलक प्रदर्शनीमध्ये लावण्यात आले आहेत.
माकड प्रदर्शनी, बायोम थीम'वर उद्याने - माकडांकरिता कृत्रिम निवास बनवण्यात आला आहे. यात आकर्षक संरचना, झोपाळे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उष्णकटिबंधीय, आर्द्रता असलेल्या, दमट हवामानात असलेल्या भागातील गवताळ उद्याने बनवण्यात आली आहे.
सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान-प्राणिसंग्रहालयातील विविध झाडे, प्राणी-पक्षांना पिण्यासाठी, सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. दररोज सुमारे ३ ते ५ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून न राहता स्वबळावर सर्व सुविधा चालविण्याच्या दृष्टीने सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा तयार करण्यात आली आहे. या संयंत्रणे अंतर्गत दररोज सुमारे ५ लाख लिटर प्रक्रिया केलेले पाणी मिळणार असून, सुमारे ७ लाख लिटर पाण्याची क्षमता असलेल्या अंडरग्राऊंड टाकीमध्ये हे पाणी साठविण्यात येईल. शुद्धीकरण केलेले हे पाणी प्राणिसंग्रहालय परिसरातील जलसिंचन प्रणालीशी जोडून संपूर्ण परिसरास सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जाईल.
हेही वाचा - Mahavikas Aghadi : मुख्यमंत्र्यांची सामंजस्य भूमिका महाविकास आघाडीला लाभदायी; एकत्र लढल्यास भाजपाचा निभाव...