मुंबई - लोकलमध्ये डुलकी घेणाऱ्या प्रवाशांची लॅपटॉप बॅग चोरणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये रॅकवर लॅपटॉप बॅग ठेवून डुलकी मारणाऱ्या प्रवाशांच्या बॅग चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी चार लॅपटॉप चोरांना अटक केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी मोहमद इस्माईल, मनीष शेंडे, आकाश गरेवाल, अकबर खान या चार जणांना अटक केली आहे. मनीष शेंडे व अमन गरेवाल हे दोघेही सराईत लॅपटॉप चोर आहेत. गेल्या काही दिवसात या दोघांनी बांद्रा ते गोरेगाव या दरम्यान 7 लॅपटॉप चोरले होते. आरोपी लोकलमध्ये प्रवासी झोपी जाण्याचे वाट पाहायचे आणि वेळ मिळताच हातोहात बॅग लंपास करून पळून जायचे.
चोरलेला लॅपटॉप हे दोन्ही आरोपी मोहमद इस्माइल व अकबर खान या दोन जणांना विकत असल्याचे समोर आले आहे. यातील आरोपी आकाश गरेवाल हा एड्स रोगाने ग्रस्त असून तो मुंबईतील डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुटपाथवर राहतो. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.