मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अद्याप लस आलेली नाही. तोपर्यंत मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून, नाईट क्लब, रेस्टॉरंट, पबमध्ये नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. रविवारी रात्री पालिकेने चार हाॅटेलवर कारवाई करत मास्क न घालणाऱ्या ५६० लोकांकडून ४३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मास्क न घालणाऱ्यांवर यापूर्वीही कारवाई
५ डिसेंबर रोजी लोअर परळ येथील एटीमोल व वांद्रे येथील पबवर छापा टाकत विना मास्क गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. एटीमोल या नाईट लाईफ हाऊसमध्ये दोन हजार लोक एकत्र आल्याचे निदर्शनास आले. तसेच सकाळी चार वाजेपर्यंत हे क्लब सुरू होते. त्यामुळे क्लबवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वांद्रे येथील पबमध्ये विना मास्क उपस्थित असलेल्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
चार हाॅटेलवर कारवाई
रविवार १३ डिसेंबर रोजी दादरच्या प्रितम हाॅटेलमध्ये छापा टाकला असता, त्या ठिकाणी लोकांनी गर्दी केल्याचे निदर्शनास आले. यानंतर पालिकेने १२० लोकांवर दंडात्मक कारवाई केली. तर खार येथील बाॅम्बे अड्डा या ठिकाणी गर्दी झाल्याची माहिती पालिकेच्या संबंधित विभागाला मिळाली होती. पालिकेच्या गस्ती पथकाने २७५ विना मास्क लोकांवर दंडात्मक कारवाई करत ३० हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर मालाड येथील रुड लाॅजमध्ये ७५ लोक विना मास्क आढळले. कांदिवली भगवती हाॅटेलमध्ये ९० लोक विना मास्क सापडल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी रात्री चार हाॅटेलवर कारवाई करत एकूण ५६० विना मास्क लोकांकडून ४३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई
दरम्यान, पब, हाॅटेलमध्ये कोरोना काळातही नागरिक गर्दी करत आहेत. याआधीही पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी याप्रकरणी नाईट कर्फ्यु लावण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी काही प्रमाणात गर्दी कमी झाली होती, मात्र आता पुन्हा एकदा हॉटेलमध्ये गर्दी वाढत आहे. तसेच हॉटेल आणि पबमध्ये जाणारे लोक कोरोनाच्या नियमांचे पालन करत नसल्याने कोरोनाच्या प्रसाराचा धोका निर्माण झाला आहे. अशा नागरिकांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.