मुंबई - पूना मर्चंट्स चेंबर्सच्या शिष्टमंडळासह वालचंद संचेती तसेच पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळासह फतेचंद रांका यांनी आज (शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापारी व दुकानदारांच्या अडचणींसंदर्भात त्यांनी पवारांना निवेदन दिले.
पुणे व्यापारी महासंघात ८२ संघटना अंतर्भूत असून पुणे शहरातील २५ हजारांहून अधिक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचा यात समावेश आहे. महासंघाच्या प्रतिनिधींनी व्यापाऱ्यांच्या विविध अडचणींची माहिती देऊन याबाबत लक्ष घालण्याची विनंती शरद पवार यांना केली.
घाऊक बाजारपेठेसाठी पुणे शहरात शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्री प्रदशर्नांचे पुण्यात आयोजन करण्यासाठी सरकारने स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करावे, अशा विविध मागण्या शरद पवार यांच्याकडे मांडल्या. १०० हून अधिक कर्मचारी काम करत असलेल्या संघटनांनाही केंद्र सरकारने पीएफची सुविधा द्यावी, छोट्या व्यापाऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, व्यापाऱ्यांना निवृत्तीनंतर लाभदायी ठरेल अशी आयुषमान भारतसारखी योजना केंद्राने सुरू करावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.