मुंबई : नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी वरळी कार्यालयात घेतलेल्या मेळाव्यातील गर्दीमुळे भाजप नेत्या पंकजा मुंडेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जमावबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वरळी पोलीस ठाण्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनाच्या संकट काळात प्रतिबंध असताना गर्दी जमवून जमावबंदीचे उल्लंघन केल्याने पंकजांविरोधात हा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पंकजा मुंडेंना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल काळे यांनी दिली आहे.
समर्थकांच्या समजुतीसाठी घेतला मेळावा
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांची समजूत काढण्यासाठी पंकजा मुंडेंनी 13 जुलै मंगळवार रोजी मुंबईतील वरळी कार्यालयात मेळावा घेतला होता. यादरम्यान त्यांनी समर्थकांना संबोधित करताना कोणताही निर्णय घेण्याची योग्य वेळ असते असे सूचक विधान केले होते. तत्पूर्वी दोन दिवसांसाठी त्या दिल्ली दौऱ्यावर होत्या. दिल्लीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.
काय म्हणाल्या होत्या पंकजा?
मला मंत्रिपदाची आणि खुर्चीची लालसा नाही असे स्पष्ट करतानाच जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत हे धर्मयुद्ध टाळण्याचा मी प्रयत्न करणार आहे असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी मुंबईत नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढताना केले. कोणताही निर्णय घ्यायची एक योग्य वेळ असते, आपलं घर आपण का सोडायचं असे बोलतानाच ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्या दिवशी बघू असेही त्या सूचकपणे म्हणाल्या.
हेही वाचा - योग्यवेळी निर्णय घेणार, समर्थकांची समजूत काढताना पंकजा मुंडेंचे सूचक वक्तव्य