मुंबई - कोरोनाच्या संकटात डॉक्टरांची कमतरता भासत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यातील आरोग्य सेवेत आता लवकरच 9 हजार डॉक्टर दाखल होणार आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या नोंदणीची गरज असते. त्यानुसार कौन्सिलने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अशा डॉक्टरांना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या डॉक्टरांची नोंदणी झाल्यास किमान 9 हजार डॉक्टर सेवेत रुजू होतील, अशी माहिती कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली आहे.
हेही वाचा... 'महाराष्ट्र सरकारच्या मदतीमुळेच आम्ही सुखरूप घरी पोहोचलो'
नियमानुसार एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांना एक वर्षासाठी तात्पुरती नोंदणी कौन्सिलकडे करावी लागते. ही नोंदणी असेल तरच डॉक्टरांना एक वर्ष प्रॅक्टिस करता येते. तर ही प्रॅक्टिस झाल्यानंतरच त्यांना कायमस्वरूपी नोंदणी मिळते. त्यानुसार दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात ही नोंदणी केली जाते. नोंदणी कार्यालय मुंबईत असून ही नोंदणी इथे येऊन करावी लागते. त्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन त्यांना हजर रहावे लागत असते. या कागदपत्राची योग्य छाननी झाल्यानंतरच डॉक्टरांची नोंदणी पूर्ण होते.
सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आहे. सध्या एक वर्ष प्रॅक्टिस करणारे तात्पुरती नोंदणी असणारे 4500 डॉक्टर सेवेत आहेत. हे सर्व डॉक्टर सध्या विविध जिल्ह्यात कोविड-19 च्या लढ्यात उतरून रुग्णसेवा देत आहेत. तर एमबीबीएस पूर्ण झालेले आणखीन 4500 डॉक्टर आहेत. अशावेळी त्यांना इथे बोलावणे शक्य नाहीच पण ते योग्यही नाही. मात्र, त्याचवेळी कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळे कौन्सिलने आता ऑनलाईन नोंदणीचा निर्णय घेतला असून या प्रक्रियेला सुरुवात केल्याचे डॉ. उत्तुरे यांनी सांगितले आहे. कागदपत्रे जमा करण्यापासून सर्व प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे ही मोठी दिलासादायक बाब नव्या डॉक्टरांसाठी आणि आरोग्य क्षेत्रासाठी ठरली आहे.