मुंबई - अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि काेराेनाच्या लसीच्या दाेन मात्रा घेणाऱ्या प्रवाशांनाच उपनगरीय लाेकलने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून उपनगरी लोकल रेल्वेमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या महिन्यात पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने १२ लाख ८७ हजार प्रवाशांवर कारवाई करुन ८ कोटी ५० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. पश्चिम रेल्वेचा मुंबई विभागाची आतापर्यंतची ही रेकॉर्ड ब्रेक कारवाई असल्याची माहिती दिली आहे.
६ टक्के अधिक दंड वसूल -
काेराेनामुळे लाेकल प्रवासाची परवानगी नसल्याने नाईलाजास्तव सामान्य नागरिक विनातिकीट प्रवास करायचे. तर काहीजण अत्यावश्यक सेवेकऱ्यांचे बनावट ओळखपत्र बाळगून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे रेल्वेने तिकीट तपासनीसांकडून विनातिकीट प्रवासी म्हणून कारवाई करण्यास सुरुवात केली. पश्चिम रेल्वेचा एकट्या मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात १३५ तिकीट तपासनीसाद्वारे १२ लाख ८७ हजार प्रवाशांवर कारवाई केली. यातून ८ कोटी ५० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंतची एका महिन्यातही विक्रमी दंड वसूलीची कारवाई झाली आहे. याआधी ऑक्टोबर, २०१९ मध्ये ७ कोटी ९५ लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली होती. तर, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापेक्षा ६ टक्के अधिक दंड वसूल केल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.
रेल्वेचे प्रवाशांना आवाहन -
राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, कोरोनाच्या दोन लसी घेऊन १४ दिवस झालेल्या प्रवाशांना लोकल, ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करावा. उपनगरी गाड्यांमध्ये आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोहीमे दरम्यान ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, सिस्टमद्वारे उत्पन्न तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे अशा अनियमितता प्रामुख्याने लक्षात आल्या. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे करत आहे.
हे ही वाचा - Unclaimed Bag Found : विधान भवन परिसरात संशयित बॅग सापडली; तपासात काहीच आढळले नाही