मुंबई - तोक्ते चक्रीवादळात अडकलेल्या पी 305 या बार्जवर मदत व बचाव कार्यासाठी भारतीय नौदल अजूनही काम करत आहे. आतापर्यंत 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप भारतीय नौदलाने वाचवले असून, 66 कर्मचाऱ्यांचा मृत्यू या दुर्घटनेत झाला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या शोध व बचाव कार्यासाठी भारतीय नौदलातर्फे काम केले जात आहे. यासाठी समुद्रात खोलवर जाऊन शोध घेतला जात आहे. यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस मकरद्वारे ड्रायव्हर शोध घेत आहेत.
खोल पाण्यात जात शोध सुरू -
चक्रीवादळादरम्यान दुर्घटनाग्रस्त झालेली टग बोट वरप्रदा व पी 305 बार्ज ही समुद्रात बुडाली. नौदलाचे ड्रायव्हर्स या दोन्ही बोटींवर जाऊन शोध घेत आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांकडे आतापर्यंत 61 मृतदेह ओळख पटवण्यासाठी देण्यात आले असून, यामधील 31 मृतदेहांची ओळख पटली आहे. 28 मृतदेह हे त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आलेली असून उर्वरित मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनएचे नमुने घेतले जात आहेत.