मुंबई - मुंबईमध्ये गेल्या दहा वर्षाच्या काळात डायबेटिक्सच्या रुग्णांमध्ये ३७ टक्क्यांनी तर हायपरटेंशनच्या रुग्णांमध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी डायबेटिक्स आणि हायपरटेंशनमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये तब्बल ५२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रजा फाऊंडेशनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मुंबईमधील आरोग्य विभागाच्या हवलातून ही आकडेवारी समोर आली आहे. २४ तास धावत राहणाऱ्या मुंबईमध्ये डायबेटिक्स आणि हायपरटेंशनमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
डायबेटिक्सचा रुग्णांच्या संख्येत ३७ टक्क्यांनी वाढ - मुंबईत डायबेटिक्समुळे २०१२ मध्ये २६,६८८, २०१३ मध्ये ३६,८२२, २०१४ मध्ये ४५,६५७, २०१५ मध्ये ३५,०९८, २०१६ मध्ये ३२,८६६, २०१७ मध्ये ३१,३०५, २०१८ मध्ये ३१,४८०, २०१९ मध्ये ३५,२७५, २०२० मध्ये २८,८५८, २०२१ मध्ये ३६,६१६ रुग्णांची सरकारी रुग्णालयांमध्ये नोंद झाली आहे. २०१२ ते २०२१ या १० वर्षांच्या काळात ३७ टक्के रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईमधील कुलाबा, फोर्टच्या ए विभागात, सँडहर्स्ट रोड येथील बी विभागात, मरिन लाईन्स येथील सी विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
हायपरटेंशनच्या रुग्णांमध्ये ५ टक्क्यांनी वाढ - हायपरटेंशनच्या २०१२ मध्ये २८,५९५, २०१३ मध्ये ३३,७६२, २०१४ मध्ये ३६,२७३, २०१६ मध्ये ३७,९१८, २०१७ मध्ये ३४,६७३, २०१८ मध्ये ३३,९७०, २०१९ मध्ये ३३,३४१, २०२० मध्ये २६,४७८ तर २०२१ मध्ये ३०,०११ रुग्णांची नोंद झाली आहे. २०१२ च्या तुलनेत २०२१ मध्ये हायपरटेंशनच्या रुग्णांमध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
डायबेटिक्स, हायपरटेंशनच्या मृत्यूमध्ये ५२८ टक्क्यांनी वाढ - मुंबईत २०१२ ते २०२० या ९ वर्षाच्या काळात डायबेटिक्समुळे ० ते ४ वर्ष वयोगटातील १६९६, ५ ते १९ वर्षातील ७७, २० ते ३९ वर्षातील ७८३, ४० ते ५९ वर्षातील १३,३६७ तर ६० वर्षावरील ४९,९३० अशा एकूण ६६,५६८ मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच हायपरटेंशनमुळे ० ते ४ वर्ष वयोगटातील ४३६४, ५ ते १९ वर्षातील ६१, २० ते ३९ वर्षातील ८२८, ४० ते ५९ वर्षातील ५,६६६ तर ६० वर्षावरील २७,७४१ अशा एकूण ३९,०४० मृत्यूंची नोंद झाली आहे. २०१२ च्या तुलनेत डायबेटिक्स, हायपरटेंशनच्या मृत्यूमध्ये ५२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पालिका घरोघरी जाऊन रुग्ण शोधणार - डायबेटिक्स आणि हायपरटेंशनचे रुग्ण शोधून काढण्यासाठी ३ हजार आरोग्य सेविका घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करणार आहेत. डायबेटिक्स आणि हायपरटेंशनचा असलेला त्रास आणि रक्तामधील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी प्रशिक्षित केले जाणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पालिकेच्या २४ पैकी एका वॉर्डची निवड करण्यात आली आहे. त्यामधील अहवाल आल्यानंतर इतर वॉर्डमध्येही काम केले जाणार आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.