मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत रोज शेकडो रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. मुंबईत आज कोरोनाचे नव्याने 510 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 हजार 123 वर पोहोचला आहे. मुंबईत आज 18 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईत आतापर्यंत 361 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतून आतापर्यंत 1908 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
मुंबईत 24 तासात कोरोना विषाणूचे 510 रुग्ण आढळून आले आहेत. तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. 18 मृतांपैकी 10 जणांना दिर्घकालीन आजार होते. तर 3 जणांचा मृत्यू वार्धक्याने झाला आहे. 18 मृतांमध्ये 14 पुरुष तर 4 महिला होत्या. मृतांपैकी 2 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. 9 जणांचे वय 60 च्या वर होते तर 7 जणांचे वय 40 ते 60 दरम्यान होते.
खाटांची संख्या वाढवणार -
मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने तीव्र आजाराच्या रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून कोरोना रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवली जाणार आहे. सध्या 3 हजार खाटा असून नायर, केईएम, सेंट जॉर्ज, सेव्हन हिल मध्ये खाटांची संख्या वाढवून 4500 पर्यंत वाढवली जाणार आहे.
जेष्ठ नागरिकांची स्क्रिनिंग -
कोरोनाचा संसर्ग जेष्ठ नागरिकांना होण्याची भीती आहे. त्यासाठी झोपडपट्टी विभागात 27 एप्रिलपासून 3 मे दरम्यान 42,752 जेष्ठ नागरिकांचे स्क्रिनिंगद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामधील 691 जेष्ठ नागरिकांना पुढील उपचारासाठी पालिका आणि खासगी उपचार केंद्रांमध्ये पाठवण्यात आले आहे.
क्लिनिकद्वारे शोधमोहीम -
कोरोना रुग्ण आढळून आलेल्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले जाते. अशा क्षेत्रात कोरोना रुग्ण शोधण्यासाठी 255 क्लिनिक आयोजित करण्यात आले. त्यामध्ये 11,591 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 3713 सांशयितांचे नमुने घेण्यात आले त्यामधून 853 संशयित रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
धारावीत 632 रुग्ण, 20 रुग्णांचा मृत्यू -
मुंबईत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोनाचे नव्याने 42 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे धारावीमधील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 632 वर पोहचला आहे. धारावीत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.