मुंबई - गेल्या अडीच महिन्यापासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने कारवाईच सत्र सुरु केले आहे. आज महामंडळाने ३४३ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजार ५५५ वर पोहचली आहे. तर आतापर्यत ७ हजार २३५ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
साडे पाच हजार कर्मचारी बडतर्फ -
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करून सुद्धा कर्मचारी आंदोलन मागे घेत नाही आहेत. या संपावर तोडगा निघावा, यासाठी एसटी कृती समितीच्या सदस्यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असं आवाहन केले. मात्र, तरी सुद्धा कर्मचारी संपावर ठाम असल्याने आता महामंडळाची कारवाई जोरदार सुरु आहे. आज ३४३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. एकूण बडतर्फ कर्मचारी संख्या ५ हजार ५५५ झाली आहे. आतापर्यत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच एकूण बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ७ हजार २३५ झाली आहे.
६४ हजार पेक्षा जास्त कर्मचारी संपात -
सध्या ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी फक्त २८ हजार कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे., उर्वरित ६४ हजार पेक्षा जास्त कर्मचारी आता पण संपात सहभागी आहेत. त्यामुळे एसटीचे कोट्यवधी रूपांचा चुरडा होत आहे. याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.