मुंबई - समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रामाणिक ज्वेलर्स या दुकानावर 22 फेब्रुवारीला दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र दुकान मालकाच्या सावधगिरीने हा प्रयत्न फसला होता. दरोड्याचा प्रयत्न फसल्याने दरोडेखोरांनी त्यांच्याकडील हत्याराचा धाक दाखवत पळ काढला होता. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत दहिसर परिसरातून पाच गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, एक चॉपरसह दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी या संदर्भात भरत जगदीश शर्मा (वय-38), गेवरचंद सुठरमालजी सुठर(वय-37), शेजाद मलिक, शाहिद युसूफ खान (वय-28), फैजद हनिफ कुरेशी (वय-24) यांना बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही दुचाकी भिवंडी व मुंबईतील एन.एम.जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या होत्या. यांचा मुख्य सूत्रधार भरत जगदीश शर्मा असून त्याचे विरारमध्ये ज्वेलरी शॉप आहे. तो याआधी एका प्रकरणात गुजरातमधील कारागृहात होता. याच ठिकाणी त्याची अन्य आरोपींशी ओळख झाली.
यानंतर सर्वांनी एकत्र येऊन चोरीचा कट रचला; आणि कांदिवली येथील प्रामाणिक ज्वेलर्स, पिंपरी-चिंचवडमधील शिवम ज्वेलर्स व भिवंडीतील पारस मेडिकलवर दरोडा टाकण्याची योजना आखली. कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांनी दुकानांची व या परिसराची रेकी देखील केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर वापी, बामेर, मुंबई, नवी मुंबई, रायगड, बाबरी, मुज्जफर नगर सारख्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.