मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबई महानगर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबई महानगरपालिका रुग्णालयात अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नाहीत. असे असताना पंतप्रधान फंडातून आलेले 400 व्हेंटिलेटर धूळ खात पडले असून एकीकडे रुग्णांचा तडफडून मृत्यू होत असल्याचा आरोप भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतात शिरकाव केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान केअर फंड सुरू केला. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी या केअर फंडमध्ये भरघोस मदत केली आहे. या फंडामधून मुंबई महापालिकेला 400 व्हेंटिलेटर महिनाभरापूर्वी देण्यात आले. गेले महिनाभर हे व्हेंटिलेटर धूळखात महापालिका रुग्णालयांमध्ये पडून आहेत.
हेही वाचा - कोल्हापुरात बालविवाह रोखला; चौघांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल
व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांचा जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पंतप्रधान यांच्या फंडातून आलेले व्हेंटिलेटर वापरण्यात आले असते, तर रुग्णांचा जीव वाचवता आला असता. आज हे व्हेंटिलेटर वापरले नसल्याने जे रुग्णांचे जीव गेले आहेत. त्याला पालिका आयुक्त जबाबदार की पालिकेतील सत्ताधारी जबाबदार आहेत, याचे उत्तर द्यावे अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
याबाबत पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता याची सविस्तर माहिती घेऊन दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान मुंबई महापालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये वॉररूम सुरू केल्यापासून रुग्णालयातील बेड, आयसीयु, व्हेंटिलेटरचे बेड रिक्त आहेत. रुग्णालयातील 22,819 पैकी 10,200 बेड, आयसीयूमधील 1,737 पैकी 227, तर व्हेंटिलेटरचे 1,053 पैकी 125 बेड रिक्त असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.