मुंबई - मुंबईमधील दीड कोटी नागरिकांना सेवा सुविधा देणाऱ्या मुंबई महापालिका मुख्यालयातील बत्ती शुक्रवारी तब्बल चार तास गुल झाली होती. यामुळे पालिका मुख्यालयातील कामावर त्याचा परिणाम झाला. बेस्टच्या वीज पुरवठा विभागाकडून चार तासाच्या प्रयत्नानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.
महापालिका मुख्यालय -
मुंबईमधील नागरिकांना आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, बेस्ट उपक्रमाद्वारे परिवहन आणि वीज पुरवठा आदी सुविधा महापालिकेकडून दिल्या जातात. मुंबईला विविध सुविधा देणाऱ्या महापालिकेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर आहे. या इमारतीत महापौर, पालिका आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, विविध समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, अतिरिक्त आयुक्त आदींची कार्यालये आहेत. महापालिका मुख्यालयात मुंबईच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कार्यालयही आहे.
पालिकेच्या कामावर परिणाम -
मुंबईला सोयी सुविधा देणाऱ्या महापालिका मुख्यालयातील गुरूवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळताच बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी पाचच्या सुमारास वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात बेस्ट कर्मचाऱ्यांना यश आले. चार तासांनी लाईट आली, पण कर्मचाऱ्यांची घरी जाण्याची वेळ झाली होती. दरम्यान पालिकेतील कार्यालयात जनरेटरवर तातपुरती वीज सुरू करण्यात आली. मात्र पालिकेतील कार्यालयांमधील कॉम्पुटर बंद असल्याने पालिकेच्या कामावर परिणाम झाला.
कर्मचारी अधिकाऱ्यांचे हाल -
महापालिका मुख्यालयाच्या दोन इमारती आहेत. एक दोन मजल्याची तर दुसरी सहा मजल्याची इमारत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने कर्मचारी अधिकाऱ्यांना आपले कार्यालय गाठण्यासाठी जिन्यावरून चालत जावे लागले. इतर वेळी लिफ्टने पालिका मुख्यालयात वर-खाली ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुरूवारी जिन्यावरून चालत जावे लागल्याने कर्मचाऱ्यांचे हाल झाले.
हेही वाचा - ती महिला पडली तो मॅनहोल नसून 'केबल डक्ट', मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी पालिकेने झाकण बसवले
हेही वाचा - राजकीय सूडापोटीच्या कारवाईचा आरोप करणाऱ्यांना आजची ईडीची कारवाई ही चपराक - प्रवीण दरेकर