मुंबई - जगभरातील 48 देशांमधील 2000 हुन अधिक जणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या 4 परदेशी नागरिकांना मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अटक केलेली आहे. मुंबईतील एका तरुणाला आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून तब्बल 17 लाख 22 हजार 800 रुपये विविध बँक खात्यामध्ये भरण्यास भाग पाडले. या आरोपींना पुण्यातून अटक केली आहे.
काय आहे प्रकरण-
मुंबईतील चेंबूर कॅम्प येथे नवजीवन सोसायटीत राहणाऱ्या विशाल कृष्णा मांडवकर या तरुणाला परदेशात हॉटेलमध्ये नोकरी हवी होती. यासाठी त्याने काही वेबसाईटवर नोकरी शोधण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्याला हिल्टन हॉटेल अँड सूट कॅनडा येथे नोकरी असल्याची माहिती मिळाली. पीडित व्यक्तीने जाहिरातीत दिलेल्या मेल आयडीवर स्वतःचा बायोडाटा पाठवला. त्यानंतर आरोपींनी पीडित व्यक्तीला संपर्क साधून त्याला हॉटेल अँड सूट कॅनडा येथे नोकरी लागल्याचे अपॉइन्टमेंट लेटर पाठवले होते. सदरच्या पीडित व्यक्तीला डिप्लोमॅट म्हणून मार्क ब्राऊन यांचा 4889 152 803 हा मोबाईल क्रमांक देऊन त्यास संपर्क करण्यास सांगितले होते.
उकळले तब्बल 17 लाख रूपये-
पीडित तक्रारदाराने मोबाईल क्रमांकावर मार्क ब्राऊन यांना संपर्क साधला. समोरील व्यक्तीने तक्रारदाराला विजा फी, प्रोग्राम एम्प्लॉयमेंट, रजिस्ट्रेशन, अशी वेगवेगळी कारणे सांगून तब्बल 17 लाख 22 हजार 800 रुपये विविध बँक खात्यामध्ये भरण्यास भाग पाडले. यानंतर नोकरीबद्दल कुठलीही माहिती न मिळाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विशाल मांडवकर या तरुणाने सायबर पोलिसांना या संदर्भात तक्रार दिली होती.
12 बँकांत 64 बँक खाते-
पोलिसांनी या संदर्भात तपास केला असता त्यांच्या लक्षात आले की यासंदर्भात पुण्यातील उंड्री येथून 4 परदेशी नागरिक बनावट जॉब रॅकेट चालवत आहेत. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना पुण्यातील उंड्री येथून अटक केली. या आरोपींकडून 12 भारतीय बँकांमधील 64 बँक खाते मिळून आली. ही बँक खाती महाराष्ट्र दिल्ली, पश्चिम बंगाल, ओरिसा उत्तर प्रदेश, आसाम व इतर राज्यातील असल्याचं समोर आलेल आहे. त्यापैकी 11 बँक खात्याची माहिती पोलिसांना मिळाली असून या बँक खात्यातून करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचा पोलिसांच म्हणणं आहे. त्याबरोबर या आरोपींकडे 2 परदेशी बँक अकाउंट मिळून आले. असून एक बँक अकाऊंट दुबईतील असून ते गोठविण्या करिता पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
48 देशातील तरुणांना फसविले-
धक्कादायक बाब म्हणजे आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमालात पोलिसांनी एक लॅपटॉप आढळून आला असून या लॅपटॉपमध्ये 27 हजार संभाव्य व्यक्तींचा डेटा आरोपींनी गोळा करून ठेवला होता. हे 27 हजार व्यक्ती जगभरातील 48 देशातील असून आतापर्यंत या आरोपींनी 2000 लोकांना संपर्क साधून त्यांच्याकडे पैसे लुबाडले असल्याचं समोर येत आहे. आरोपींनी नोकरीच्या शोधात असलेल्या पीडितांकडून आतापर्यंत करोडो रुपये काढले. यापैकी दहा कोटी रुपये या आरोपींना नायजेरियात बँक खात्यामध्ये वळती केल्याचही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
यासंदर्भात पोलिसांनी ओगुण साकिन मायकल ओला येईन (32) सोटो मिवा थॉमसन (25) ओप्पो येबी उडाले ओगुणोरोटी (26) ऑगस्टीन फ्रान्सिस विलियम (22) या आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा- मुंबईत कोरोनाचे 394 नवे रुग्ण; 7 रुग्णांचा मृत्यू