मुंबई - स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी 'कस्टम पॉइंट'च्या वतीने सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात सायकलपटूंनी सहभाग नोंदवला होता. मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा विविध ठिकाणांहून एकूण 200 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे हे 39 वे वर्ष आहे.
'कमी अंतराची स्पर्धा' अशी या स्पर्धेची ओळख आहे. केवळ दोन किलोमीटर अंतराची ही स्पर्धा असली, तरी वळणावळणाच्या रस्त्यामुळे जास्त प्रसिद्ध आहे. मुलांमध्ये सायकलबद्दल प्रेम जागृत व्हावे, या हेतूने ही स्पर्धा भरवण्यात येते.
सायकल स्पर्धेतून सायकलपटू घडावेत, या उद्देशाने कस्टम पॉइंट गेली 39 वर्षे सातत्याने सायकल स्पर्धा आयोजित करत आहे. कस्टम पॉइंटच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. ते आज विविध नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असल्याचे, कस्टम पॉइंटचे अध्यक्ष योगेश मानकामे यांनी सांगितले.