मुंबई - मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी (Good News to Mumbaikar) आहे. 18 फेब्रुवारी 2022 पासून मध्य रेल्वे मार्गावर (Central Railway Line) एक हजार 774 लोकल फेऱ्या ऐवजी एक हजार 810 फेऱ्या धावणार आहेत. कारण ठाणे - दिवा पाचवी सहावी मार्गिका शुक्रवारपासून सुरु होत असल्याने एकूण ३६ लोकल फेऱ्यांची भर मध्य रेल्वेवर पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यासह रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अतिरिक्त लोकल फेऱ्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
- ३६ लोकल ट्रेन वाढणार -
मुंबईकरांचा लोकलचा प्रवास गर्दीमुक्त आणि अधिक वेगवान व आरामदायी होण्यासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-2 (एमयुटीपी) मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होते. मात्र, आता या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून उद्या ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या नव्या मार्गिकेमुळे मध्य रेल्वेचा मुख्य मार्गावर एकूण ३६ लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे. या ३६ लोकलपैकी ३४ वातानुकूलित लोकल सेवा आणि दोन विना वातानुकुलीत (सामान्य) लोकल असणार आहे. त्यामुळे आता, मध्य रेल्वेवर १ हजार ७७४ ऐवजी धावणार १ हजार ८१० लोकल फेऱ्या धावणार आहेत.
- काय आहे वैशिष्ट्ये-
एमयूटीपी दोन अंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर असलेला हा प्रकल्प रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात समान खर्चाच्या वाटणीसह रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) द्वारे कार्यान्वित करण्यात आला आहे.
प्रत्येकी ९.४४ किमी लांबीची विद्युतीकृत दुहेरी लाईन.
अंदाजे रू. ६२० कोटी खर्च.
ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांतून जाणारा रेल्वेमार्ग
६ प्लॅटफॉर्म आणि ८ फूट ओव्हर ब्रिज आणि पादचारी पूलांचा विस्तार असलेला रेल्वे मार्ग.
१.४ किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, ३ मोठे पूल, २१ छोटे पूल.
१७० मीटर लांबीचा बोगदा.
- प्रकल्पामुळे फायदे:
कुर्ला ते कल्याण या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग वेगळे होतील. लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ल्याजवळ) येथून निघणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उपनगरीय वाहतुकीला अडथळा न आणता पाचव्या आणि सहाव्या मार्गावर कल्याणपर्यंत जाऊ शकतात. यामुळे रेल्वेचे कामकाज चांगले होईल.
३६ अतिरिक्त उपनगरीय सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान आणि पुढे (३४ वातानुकूलित आणि २ विना-वातानुकूलित) सुरू केल्या जातील.
कळवा, मुंब्रा या कॉरिडॉरच्या प्रवाशांना मोठा फायदा होईल कारण मेगाब्लॉक दरम्यान उपनगरीय गाड्या एकाच कॉरिडॉरमध्ये प्रवाशांना सेवा पुरवतील.
- ऐतिहासिक महत्व-
कुर्ला/लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण दरम्यानचा ५वा आणि ६वा रेल्वेमार्ग ठाण्यामधून जातो. भारतातील पहिली ट्रेन जेव्हा १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे पर्यंत धावली तेव्हा हे पहिले टर्मिनेशन स्टेशन होते.