मुंबई - विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत इन्स्पायर पुरस्कारासाठी राज्यातील 31 बालवैज्ञानिकांची आणि त्यांच्या उपकरणाची राष्ट्रीय पातळीवर निवड झालेली आहे. निवड झालेल्या 31 मध्ये पुणे जिल्ह्यातील 6, कोल्हापूर जिल्ह्यातील 4 सांगली-सातारा प्रत्येकी 3 बालवैज्ञानिकांचा समावेश आहे.
880 मुलांनी विज्ञान प्रकल्प केले सादर - केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयकडून विज्ञान शिक्षण व संशोधना संबंधीचा इन्स्पायर हा शालेय विद्यार्थ्यांकरिता महत्वकांक्षी कार्यक्रम सुरू केलेला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच विज्ञान विषयाचा अभ्यासाकडे आकर्षित करणे आणि विज्ञान व तंत्रज्ञान यामधील संशोधन व विकास यासाठी त्यांना चालना देणे असा आहे. 2019-20 मध्ये राज्य सरकारच्या संकेतस्थळावर ज्या बालवैज्ञानिकांनी आपल्या प्रकल्पाची नोंदणी केली होती. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी प्रकल्पाच्या माहिती पूर्ण व्हिडिओ तयार करून ऑनलाइन सादरीकरण केले होते. त्यांचे जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय समितीने परीक्षण केले होते. 2020-21 मध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील तब्बल 880 मुलांनी विज्ञान प्रकल्प पाठवले होते. विज्ञान आधारित मॉडेल जिल्हास्तरावर सादर केल्यानंतर त्यातील उत्कृष्ट उपक्रमांची विभाग, राज्यस्तर अशा क्रमाने निवड केली जाते. या स्पर्धेसाठी खासगी मराठी आणि इंग्लिश मिडीयम शाळा नव्हे तर, महापालिकेच्या शाळेने देखील विद्यार्थी निवड करून योग्यता दाखवून दिली आहे. पहिला क्रमांक पुण्याचा लागला तर कोल्हापूर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. त्याखालोखाल सांगली, सातारा जिल्ह्यातून प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
निवड झालेल्या बालवैज्ञानिकांची यादी - पुणे जिल्ह्यातील 6, मुंबई शहर 1, कोल्हापूर 4, सांगली 3, सातारा 3, अहमदनगर 1, नागपूर 1, नंदुरबार 1, गोंदिया 1, जळगाव 1, जालना 2, अमरावती 2, औरंगाबाद 1, बीड 1, अकोला 1, नाशिक 1 आणि पालघर 1 असे राज्यातील 31 बालवैज्ञानिकांची आणि त्यांच्या उपकरणाची राष्ट्रीय पातळीवर इन्स्पायर पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.
हेही वाचा - Mask Free Mumbai Soon : मुंबईकरांसाठी खुशखबर.. मुंबई लवकरच होणार मास्क मुक्त..